CrimeNewsUpdate : शिधापत्रिकाधारकांचा तांदूळ गुजरातकडे घेऊन जाणाऱ्या तांदूळ चोरांना अटक

जन्मजात भ्रष्टाचाराची आणि चोरीची सवय लागलेल्या लोकांना लोक किंवा आपण स्वतः कुठल्या संकटात आहोत याची चिंता वाटत नाही. कोरोनाच्या संकटाच्या काळातही अनेक संधीसाधू लोक वेळ मिळताच संधी साधताना दिसत आहेत. अशीच एक घटना पोलिसांनी उघडकीस आणली असून पोलिसांनी तांदूळ चोरांना अटक केली आहे. या प्रकरणात त्यांनी जामखेड तालुक्यातून तब्बल २४ टन रेशनचा तांदूळ गुजरातला काळ्या बाजारात विकण्यासाठी निघालेला ट्रक पकडला आहे. जामखेड तालुक्यातील चौंडी येथे सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली.
जामखेड तालुक्यातील सोनगाव येथील मंदा सुग्रीव वायकर यांच्या नावे असलेल्या रेशन दुकानातील हा तांदूळ आहे. ट्रकचालक शशिकांत भीमराव गवळी (रा. कुर्डूवाडी ता. माढा) व सहचालक संदीप सुनील लोंढे (रा. बारलोणी ता. माढा जिल्हा सोलापूर) या दोघांना पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून २४ टन तांदळासह ट्रक जप्त केला आहे. वायकर यांच्या दुकानातील हा तांदूळ असल्याचे ट्रकचालकांनी सांगितल्यावर पोलिस व अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन तपासणी केली. तेंव्हा दुकानातील धान्यांच्या नोदींतही तफावत आढळून आली. त्यामुळे दुकानदाराविरूद्धही कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. तांदळाने भरलेला ट्रक सोनगाव येथून नान्नज, चौंडी, चापडगाव मार्गे गुजरातला जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यामुसार त्यांनी चौंडी येथे सापळा रचला होता. ट्रक क्रमांक एमएच टी ७३९६ मधून २४ टन तांदूळ नेला जात होता.