CoronaMarathwadaUpdate : विलगीकरणात असताना गावात का आले म्हणून गावकऱ्यांची बेदम मारहाण

देशात , राज्यात सर्वत्र लोकांनी कोरोना संसर्गाचा इतका धसका घेतला आहे कि , लोक यामुळे माणुसकी विसरत चाललेले आहे . हिंगोली जिल्ह्यात असाच एक अमानुष प्रकार घडला . त्याचे असे झाले कि , विलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गावात परतलेल्या वडार समाजातील एका कुटुंबाला गावकऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. मारहाण करणाऱ्यामध्ये गावच्या उपसरपंचाचाही समावेश होता. धक्कादायक म्हणजे, नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलादेखील मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयीची माहित अशी कि , हट्टा येथील सुरेश जाधव यांचे कुटुंब करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याचे समोर आल्यानंतर या कुटुंबास १४ दिवसांकरिता विलग करण्यात आले होते. त्यामुळे हे कुटुंब आपल्या शेतामध्ये राहात होते. १४ दिवसांचा काळ पूर्ण झाल्यामुळे बुधवारी, २७ मे रोजी कुटुंबातील काही सदस्य गावात आले. ‘तुम्हाला करोना झाला आहे. तुम्ही गावात का फिरता’ या कारणावरून गावातील सोमनाथ शेळके, गोविंद शेळके, चंद्रकांत शेळके, नितीन गौतम, राहुल, भीमा, राहुल, ससाने व सिद्धांत शेळके यांनी सुरेश जाधव त्याची पत्नी बेबी जाधव, रावसाहेब जाधव व त्याची पत्नी पूजा जाधव यांना शेतात जाऊन काठीने व रॉडने मारहाण केली. नऊ महिन्यांची गरोदर असणाऱ्या बेबी जाधव (वय २८) या महिलेला देखील मारहाण करण्यात आली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला. दरम्यान या प्रकरणी बेबी जाधव यांच्या फिर्यादीवरून हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, याच प्रकरणी सदर कुटुंबाच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.