CoronaVirusEffect : सर्वोच्च न्यायालयाचा खासगी रुग्णालयांना दणका, केंद्र सरकारला खुलासा करण्याचे निर्देश

दिवसेंदिवस देशात कोरोनाव्हायरसचा संसर्ग वाढत असून त्यामुळे शासकीय रुग्णालयावरील ताण वाढला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांची मदत घेण्याचा विचार केला जातो आहे. मात्र खासगी रुग्णालयातील उपचार परवडणारे नाहीत, या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने खासगी रुग्णालयं कोरोना रुग्णांवर मोफत उपचार का करू शकत नाही? अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला केली आहे. दरम्यान खासगी रुग्णालयांना मोफत उपचार देण्यात काय समस्या आहे ते सांगावं, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने सरकारला दिलेत.
याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून खासगी रुग्णालयांसंबंधात माहिती मागितली आहे.जर खासगी रुग्णालयं रुग्णांवर मोफत उपचार करू शकत नाही तर सरकारने या रुग्णालयांना मोफत जमिनी का दिल्या? असं विचारत सुप्रीम कोर्टाने सरकारलाही धारेवर धरलं आहे. सरन्यायाधीश एस ए बोबडे म्हणाले, “खासगी रुग्णालयांना सरकार मोफत जमीन देतं किंवा मोजकीच किंमत आकारतं. त्यामुळे या रुग्णालयात महासाथीच्या वेळी संक्रमितांवर मोफत उपचार करायला हवेत”
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात सध्या १ लाख ५१ हजारहून अधिक रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत भारतात ६३८७ नवीन रुग्णांची नोंद झाली. सलग दुसऱ्या दिवशी भारतातील रुग्णांची संख्या कमी झालेली पाहायला मिळाली. तर गेल्या २४ तासांत १७० लोकांचा मृत्यू झाला आहे. यावरून भारतातील मृत्यू दरही कमी झाल्याचे दिसत आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाचा कहर काही थांबत नाही आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात २०९१ नवीन प्रकरणं समोर आली आहेत. तर यात ९७ लोकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या सर्वात जास्त आहे. मुंबईमध्ये गेल्या २४ तासांत १००२ रुग्णांची नोंद झाली आहे तर ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आता एकूण कोरोबाधितांची संख्या ३२ हजार ९७४ झाली आहे. तर,१०६५ लोकांचा मृत्यू झाला आहे.