PoliticsOfMaharashtra : राज्यपालांच्या भेटीवर शरद पवारांनी स्वतःच केला खुलासा… बघा काय म्हणाले ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याची प्रत्येक कृती राजकीय अर्थाने पहिली जाते . लॉकडाऊनच्या काळात काही दिवस शांत राहिलेले शरद पवार आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर झोतात आले. त्यानंतर मोदींना पत्र लिहिल्यानंतर अधिक चर्चेत आले आणि आता त्यांनी राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यामुळे ते जास्तच चर्चेत आले आहेत दरम्यान यावरून सुरु झालेल्या संभाव्य भूकंपाच्या चर्चांना खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच खुलासा करून पूर्णविराम दिला आहे. ‘काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रित काम करत आहेत आणि राज्यपालांचंही हेच मत असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यात कालपासून सुरू असलेल्या घडामोडींवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना पवार यांनी हे भाष्य केलं. ‘महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करत आहेत. कोरोनाच्या महामारीतून महाराष्ट्राला बाहेर कसं काढायचं यावर आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे. तिन्ही पक्षांची भूमिका या बाबतीत एकच आहे,’ असं शरद पवार म्हणाले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीबद्दलही पवार यांनी खुलासा केला. ‘करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा होत असते. अनेकदा आम्ही दादरमध्ये भेटतो. काल मीच ‘मातोश्री’वर येतो असं उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. तिथं गेल्यावर आम्ही करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्णांची संख्या, आरोग्य सुविधा याचबरोबर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी याबद्दल चर्चा झाली. राजकाणाचा विषय नव्हता,’ असं पवार म्हणाले.
पवार पुढे म्हणाले कि , ‘राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मला दोनवेळा चहाचे निमंत्रण दिले होते. त्यामुळं काल भेटायला गेलो. मुख्यमंत्री चांगलं काम करत आहेत. तिन्ही पक्ष एकत्र काम करताहेत असं स्वत: राज्यपालांचं मत असल्याचं पवार यांनी सांगितलं. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही पवारांच्याच सुरात सूर मिसळला आहे. ‘शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे हे काँग्रेसच्या सातत्यानं संपर्कात असतात. काँग्रेसमधील एखाद्या नेत्यानं काही मत व्यक्त केलं असेल तर ते त्याचं वैयक्तिक मत आहे. त्याचा सरकारशी संबंध नाही. राष्ट्रपती राजवटीच्या बातम्या या मीडियातील चर्चा आहेत. मुंबईत किंवा दिल्लीत कुठंही त्याबद्दल चर्चा नाही,’ असंही थोरात म्हणाले.