#CoronaMaharashtraUpdate : चिंताजनक : गेल्या २४ तासात आणखी ८० पोलिसांना बाधा , एकूण रुग्णसंख्या १८८९ तर मृत्यूंची संख्या २०

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोरोनाबाधित पोलिसांची संख्या ८० झाली असून संपूर्ण राज्यात आतापर्यंत १८८९ पोलीस कोरोनाबाधित झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत २० पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत २ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांशी संबंधित १०३० केस सध्या अक्टिव आहेत. तर ८३८ पोलीस कर्मचाऱ्यांची तब्येत बरी झाली आहे.
दरम्यान पोलिस दलाला करोनाचा विळखा अधिकच घट्ट होत चालला असून मुंबई मधील आणखी एका पोलिसाचा करोनाने मृत्यू झाला आहे. वाहतूक शाखेत नेमणुकीला असलेले पोलिस कॉन्स्टेबल जयंत खंडाईत (५७) यांचे सोमवारी पहाटे उपचारादरम्यान निधन झाले. करोनाच्या संकटात आरोग्य सेवेतील योद्धयांप्रमाणे पोलिसही जीवाची बाजी लावून लढत आहेत. बंदोबस्त, गस्त, नाकाबंदी यामुळे पोलिसांचा थेट संपर्क नागरिकांशी येत असल्याने पोलिसांत करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबई पोलिस दलातील वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या जयंत खंडाईत यांना करोनाची लागण झाल्यामुळे उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
वाहतूक शाखेत शिक्षण विभागात नेमणुकीला असलेले खंडाईत वरळी येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे मुंबई पोलिस दलातील करोनाने मृत्यू पावलेल्या पोलिसांची संख्या १२ वर पोहोचली असून राज्यात आतापर्यंत २० पोलिसांचा करोनाने मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत १८८९ पोलिसांना करोनची लागण झाली असून यामध्ये १९४ अधिकारी आणि १६९५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ६७८ पोलिस बरे होऊन घरी परतले असून ११९१ पोलिसांवर अद्यापही उपचार सुरु आहेत. दरम्यान, नाशिक ग्रामीण पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा सोमवारी मृत्यू झाला. संबंधित पोलिसाचे यापूर्वीचे सर्व स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले होते मात्र, प्रकृती खालावत जाऊन आज त्यांचा मृत्यू झाला. मालेगाव येथून बंदोबस्त आटोपून हा पोलीस घरी परतला होता. जिल्हा पोलिस दलातील हा दुसरा मृत्यू आहे.