Maharashtra Update : राज्यात कोरोनाचा वाढता कहर , रुग्णसंख्या ५० हजाराच्या वर , जाणून घ्या कुठे किती आहेत रुग्ण ?

राज्याचा कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजार पार गेला आहे. तर आज एकाच दिवशी तीन हजारहून अधिक रुग्ण राज्यात आढळले आहे. राज्यात आज 3041 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. अशारीतीने राज्य़ाचा कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 वर पोहोचली आहे. दिवसभरात 58 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूंची संख्या 1635 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 1196 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 14 हजार 600 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सध्या राज्यात 33 हजार 988 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात 58 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 38 मृत्यू हे मागील 24 तासांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे 23 एप्रिल ते 20 मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईतील 39, पुण्यात 6, सोलापूर 6, औरंगाबाद शहरात 4, लातूरमध्ये 1, मीरा भाईंदरमध्ये 1 आणि ठाणे शहरात 1 मृत्यू झाला आहे.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 34 पुरुष तर 24 महिला आहेत. आज झालेल्या 58 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 30 रुग्ण आहेत तर 27 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 1 जण 40 वर्षांखालील आहे. या 58 रुग्णांपैकी 40 जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 3 लाख 62 हजार 862 नमुन्यांपैकी 3 लाख 12 हजार 631 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 50 हजार 231 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 4 लाख 99 हजार 387 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये असून 35 हजार 107 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.