#CoronaMaharashtraUpdate : गेल्या 24 तासात 87 पोलिस पॉझिटिव्ह , कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 1671

राज्यभरातील पोलिसांभोवती कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कारण गेल्या 24 तासांत तब्बल 87 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 1671 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाने एकूण 18 पोलिसांचा बळी घेतला आहे. कोरोनाच्या संकटात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलिसही दिवसरात्र मेहनत घेत आहेत. मात्र आता हेच पोलिस कोरोनाच्या कचाट्यात येत आहेत. अनेक पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत.
आतापर्यंत 174 पोलिस अधिकारी तर 1497 पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. तर 18 पोलिसांना करोना मुळे जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत 673 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात लॉकडाऊन 4 लागू केल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मात्र, आता पोलिसच कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांची सर्वाधिक मुंबईत आहे.
मुंबईमध्ये दिवसागणिक कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोनाच्या विळख्यातून मुंबई पोलिस देखील सुटू शकलेले नाहीत. मुंबई पोलिसाचा कोरोना मुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आता 65 लाखाची मदत केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. महाराष्ट्र सरकारकडून 50 लाख रूपये आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी, मुंबई पोलिस फाऊंडेशनकडून 10 लाखाची मदत आणि खासगी बॅंक इन्श्युरन्सकडून 5 लाखाचा विमा असं स्वरूप असेल. मुंबई पोलिस कमिशनर परम बीर सिंग आणि डीसीपी प्रणय अशोक यांनी हा निर्णय घेतला आहे.