#CoronaUpdateMumbai : मुंबईची एकूण रुग्ण संख्या २८ हजारावर तर मृत्यूंची संख्या ९४९

कोरोनामुळे मुंबईत आज आणखी ४० रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ९४९ मुंबईकरांचा या साथीने बळी घेतला आहे. मुंबईत १५६६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर २४ तासांत ३९६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. पालिकेच्या नोंदीनुसार एकूण रुग्णसंख्या आता २८६३४ इतकी झाली आहे. मुंबई महापालिका हद्दीत करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. गेल्या २४ तासांत मुंबईतील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या ४० करोनारुग्णांचा मृत्यू झाला. या ४० रुग्णांमध्ये २२ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांपैकी २५ रुग्ण पुरुष होते तर १५ रुग्ण महिला होत्या. मृतांमध्ये चौघेजण ४० वर्षांच्या आतील होते तर २१ रुग्ण ६० वर्षांवरील होते. बाकीचे १५ रुग्ण ४० ते ६० वर्षे या दरम्यानचे होते.
मुंबई मधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३० हजारच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या नोंदीनुसार मुंबईत सध्या करोना बाधित रुग्णांची संख्या २८६३४ इतकी झाली आहे. आज एकूण १५६६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यातील १२७४ रुग्ण गेल्या २४ तासांत आढळले आहेत तर २९२ रुग्ण १९ ते २१ मे दरम्यान विविध प्रयोगशाळांत घेण्यात आलेल्या चाचण्यांतून आढळले आहेत. करोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आज वाढले आहे. आज ३९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत आतापर्यंत ७ हजार ४७६ रुग्णांना करोना विरुद्धची लढाई जिंकण्यात यश मिळवले आहे. मुंबईत करोना सदृष्य लक्षणे असलेल्या रुग्णांवरही बारीक लक्ष ठेवला जात आहे. आज दिवसभरात विविध रुग्णांलयांत असे १०५९ रुग्ण दाखल झाले आहेत. आतापर्यंत अशा २४ हजार ३२३ रुग्णांना दाखल करून घेण्यात आले आहे.
दरम्यान धारावी परिसरात नवीन करोना बाधित रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे. आज धारावीत ३३ नवे रुग्ण आढळले तर एका उपचार घेत असलेल्या रुग्णाचा आज मृत्यू झाला. आज आढळलेल्या ३३ रुग्णांपैकी सर्वाधित ५ रुग्ण माटुंगा लेबर कॅम्प भागातील आहेत. धारावीतील एकूण रुग्णसंख्या आता १५१४ इतकी झाली आहे.