#CoronaEffectMaharashtra : सावधान : १६६६ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, ४७३ जणांना डिस्चार्ज….

कोरोना बंदोबस्ताचा पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाची लागण होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून, त्यामुळे पोलिस दलासह त्यांच्या कुटुंबीयांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे. गुरुवारपर्यंत राज्यातील पोलिस दलातील करोनाबाधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १,६६६ इतकी झाली असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांत तब्बल २८८ पोलिसांना लागण झाली आहे. करोनामुळे आत्तापर्यंत मृत्यू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १७ इतकी झाली आहे.
मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांमध्ये १८३ अधिकारी आणि १४८३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गुरुवारी रात्री विलेपार्ले पोलिस ठाण्यातील शिपाई, ठाणे पोलिस दलातील महिला शिपाई यांचे करोनाने निधन झाले. त्यामुळे दलात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान पोलिसांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरीही ४७३ पोलीस कर्मचारी यशस्वी उपचारानंतर घरी गेले असून यामध्ये ३५ पोलिस अधिकारी आणि ४३८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.