MaharashtraNewsUpdate : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४४ हजाराच्या वर , बऱ्या झालेल्या रुग्णांपेक्षा रुग्णवाढीचा वेग तीन पट

आज दिवसभरात करोनाचे २ हजार ९४० नवे रुग्ण आढळल्याने राज्याने करोना रुग्णांचा आज नवा उच्चांक गाठला असून परिस्थिती अधिक चिंताजनक होत आहे. गेल्या २४ तासांत करोनाने ६३ रुग्ण दगावले आहेत तर त्याचवेळी ८५७ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे तर या रुग्णांच्या तुलनेने नवे रुग्ण येण्याचा वेग तीन पट असल्याचे आढळून आले आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या आता ४४ हजार ५८२ इतकी झाली असून त्यातील ३० हजार ४७४ रुग्ण अॅक्टिव्ह असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान राज्यात करोना मृत्यूदर अद्याप कमी झालेला नाही. गेल्या २४ तासांत करोनामुळे ६३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्यात ३७ पुरुष तर २६ महिलांचा समावेश आहे. आज झालेल्या ६३ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २८ रुग्ण, ४० ते ५९ या वयोगटातील ३१ रुग्ण तर ४ रुग्ण ४० वर्षांखालील होते. ६३ पैकी ४६ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार होते. राज्यात करोनामुळे आतापर्यंत १५१७ जणांचा मृत्यू झाला आहे.