COVID 19 च्या मुकाबल्यासाठी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची संयुक्त चर्चा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी सात वाजता, राजभवन येथे, एकत्रितरित्या राज्यातील स्थितीचा आढावा घेणार आहेत. करोनावर मात करण्यासाठी कोणती पावले उचलण्यात येत आहेत, तसेच येत्या काळात कोणत्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. या मुद्द्यांवर, या बैठकीत चर्चा होणार आहे.
राज्यातील करोना स्थितीवर, राज्यपालांसोबत ही पहिलीच उच्चस्तरीय बैठक होत आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव, विविध विभागांचे सचिव, पालिका आयुक्त, राज्याचे पोलीस महासंचालक आणि अन्य प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन, संचारबंदी यासारखे पावले उचलली आहेत. मात्र मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांत लोकवस्ती दाट असल्याने करोनाचा फैलाव रोखणे शक्य झाले नही. मुंबईत कालपर्यंत करोनाबाधित रुग्णांचा आकडा २२ हजारच्यापुढे गेला होता तर राज्यात ही संख्या ३७ हजारच्या पुढे गेली आहे. या स्थितीचा सामना करत असतानाच भविष्यात रुग्णांची संख्या अधिक वाढण्याचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकार त्यादृष्टीने काम करत आहे. मुंबई, पुण्यासह पालिका हद्दींत जास्तीत जास्त वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी ठोस पावले टाकण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुल येथे एमएमआरडीएने अवघ्या १५ दिवसांत तात्पुरते कोविड केअर सेंटर उभारून ते महापालिकेकडे हस्तांतरित केले आहे. १ हजार खाटांची क्षमता या केंद्रात आहे. एकीकडे करोनाशी सक्षमपणे लढा दिला जात असताना आर्थिक कोंडी फोडण्यासाठी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात रेड झोन वगळून उर्वरित महाराष्ट्रात अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.