#CoronaVirusUpdate : देशात आता समूह संसर्गाचा धोका , शुक्रवारी भारताने चीनला एक हजाराने मागे टाकले ….

सरकारकडून कितीही नकार देण्यात येत असला तरी देशात समूह संसर्ग सुरू झाला आहे असे मानूनच देशाला योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे . समूह संसर्ग ही शक्यता नाही तर खराखुरा धोका आहे असे नमूद करताना ‘पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष प्रोफेसर के श्रीनाथ रेड्डी यांनी देशात यापुढेही लॉकडाऊन सुरू ठेवण्याच्या निर्णयाचं समर्थन केले आहे. लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर धोका आणखीन वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान भारतात कोरोना आपले हात-पाय पसरत असून मे महिन्यात सर्वाधिक रुग्ण समोर येत असल्याचं दिसतं असून . शुक्रवारपर्यंत देशात जवळपास ८२ हजार करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याच दरम्यान आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांकडून भारताला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, भारताला कोविड १९ च्या समूह संसर्गासाठी अर्थात तिसऱ्या टप्प्यासाठी (corona third stage) तयार राहावं लागणार आहे. विशेष म्हणजे वर्ल्डो मीटर वेबसाईटने दिलेल्या माहिती नुसार कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारत चीनपेक्षाही पुढे आला आहे. शुक्रवारी देशात आत्तापर्यंत ८३ हजार ०७२ करोनाबाधित रुग्ण आढळलेत तर चीनमध्ये आत्तापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या ८२ हजार ९७७ आहे. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे.
जागतिक महामारी ठरलेल्या या आजाराचा समूह संसर्ग त्या देशातही दिसून आलाय जिथं याचं भयंकर स्वरुप पाहायला मिळत आहे . भारतालाही यासाठी तयार राहावं लागेल. देशव्यापी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही प्रमाणात सूट मिळाल्यानंतर करोना आणखीन वेगात पसरू शकतो, अशी शक्यता रेड्डी यांनी व्यक्त केली आहे. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, देशातील काही भागांत करोनाचा तिसरा टप्पा अर्थात समूह संसर्गाला अगोदरच सुरुवात झाली असून देशातील काही भागांत कोणताही प्रवास न करणाऱ्या आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात न आलेले (नकळत) काही जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यामुळे समूह संसर्गाला भारत आता सामोरे जात आहे.