#CoronaVirusEffect : पृथ्वीराज चव्हाण यांचं चुकलं काय ? त्यांना मंदिर प्रवेश नाकारणारे हे महंत आहेत तरी कोण ?

#Stimulus @PMOIndia सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. #WorldGoldConcil च्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे.
— Prithviraj Chavan (@prithvrj) May 13, 2020
कोरोनाच्या संकटकाळात सरकारने देवस्थानांच्या ट्रस्टमधून सोने अल्पव्याजदराने कर्जस्वरुपात ताब्यात घ्यावे आणि गोरगरिबांना मदत करावी असे वक्तव्य करणारे काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर मोदी समर्थंक माध्यमांनी टीका केल्यानंतर मंदिरांच्या धर्मगुरुंनीही तर पृथ्वीराज चव्हाण यांना फैलावर घेतलं आहे. याच दरम्यान श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या महंत कुटुंबाने जाहीर केलेल्या निर्णयात म्हटले आहे कि , पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आजीवन काशी विश्वनाथ मंदिरात बंदी घालण्यात येत आहे. सोबतच देशातील इतर ज्योतिर्लिंग पुजाऱ्यांनाही त्यांनी चव्हाण कुटुंबाला मंदिरात प्रवेश नाकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इतकंच नाही तर ‘पृथ्वीराज चव्हाण हे मानसिकदृष्ट्या विक्षिप्त’ असल्याची टीकाही या महंतांनी केली आहे.
कोरोना संकटकाळात अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकार पॅकेजच्या साहाय्यानं मदत देण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी, ‘वर्ल्ड गोल्ड काउन्सिल म्हणण्यानुसार, देशात १ ट्रिलियन सोनं आहे. दोन-तीन टक्के व्याजदरावर सोनं सरकारला कर्जरूपानं ताब्यात घेता येईल आणि कालांतरानं परत करता येईल’, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. मात्र चव्हाण यांच्या या वक्व्यावर भाजपनेही टीका केली होती. तर पृथ्वीराज चव्हाण यांचा हा सल्ला मोठ्या मोठ्या मंदिराच्या महंतांना आणि पुजाऱ्यांना हा आपल्या धर्मावर आघात वाटतोय. त्यामुळेच काशी विश्वनाथ मंदिराचे माजी महंत डॉक्टर कुलपती तिवारी यांनी ‘मी पृथ्वीराज चव्हाण यांचं हे वक्तव्य ऐकून थबकलोय. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातच १९८३ च्या काळात काशी विश्वनाथ मंदिरात चोरी झाली होती. या चोरीत काँग्रेसनं मुख्य भूमिका निभावली होती’, असा आरोप करत आपला राग व्यक्त केलाय. ‘पृथ्वीराज चव्हाण यांचं मानसिक संतुलन ढासळलंय किंवा ते पूर्वाग्रहानं ग्रासलेले आहेत. मंदिरात भक्तांनी देवाला अर्पण केलेलं दान, पुण्य आणि फळ सरकार घेत नाही’, असंही तिवारी यांनी म्हटलंय. यापुढे, पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना विश्वनाथ मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार नाही. मी देशातील इतर ज्योतिर्लिंगांच्या महंतांनाही हाच आग्रह करतोय की त्यांनीही चव्हाणांच्या प्रवेशाला बंदी घालावी. याचा बहिष्कार होण्याची आवश्यकता आहे, अशी आगपाखड तिवारी यांनी केलीय.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणतात ?
या वादावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे कि , ‘सोनं ताब्यात घेण्याच्या माझ्या सल्ल्याचा काही भक्त मीडियानं जाणीवपूर्वक विपर्यास केला. माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं लोकांपुढे मांडून धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोखरण अणुचाचणीनंतर तत्कालीन वाजपेयी सरकारनं सुवर्ण तारण योजना सुरू केली होती. मोदी सरकारनंही २०१५ साली नाव बदल करत ही योजना लागू केली. देशातील आठ मंदिरांनी त्यांच्याकडील सोनं विविध बँकांमध्ये जमा केलं होतं. मोदी सरकारच्याच अर्थमंत्र्यांनी स्वत: लोकसभेत याची माहिती दिली होती. आतापर्यंत २०.५० टन सोनं जमा झाल्याचं केंद्र सरकारचा अहवाल सांगतो’ असं म्हणत आपल्या टीकाकारांना प्रत्यूत्तर दिलंय.