#CoronaVirusEffect : मुंबईत आणखी दोन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू , पोलिसांच्या आईचेही कोरोनामुळे निधन …

राज्यात कोरोनाचा उद्रेक चालूच असून मुंबईत आणखी दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात हा आकडा ११ वर पोहोचला आहे. शाहूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकासह मोटार परिवहन विभागातील सहायक फौजदारांचा यात समावेश आहे. मुंबई पोलीस दलाकडून ट्विटद्वारे ही माहिती देण्यात आली. मुंबई पोलीस दलानं या दोन्ही ‘योद्ध्यां’ना श्रद्धांजली वाहिली आहे. मोटार परिवहन विभागात सहायक फौजदार असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक हे ५७ वर्षांचे होते. ते गेल्या पंधरा दिवसांपासून रजेवर होते, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीरकेल्यानंतर लोकांना रस्त्यावर येण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यासाठी मोठी जोखीम असतानाही मुंबई पोलिसांसह राज्यातील पोलीस अहोरात्र परिश्रम घेत आहेत. दरम्यान सेवा आणि कर्तव्य बजावताना पोलिसांनाही करोनाचा विळखा पडला आहे. राज्यात करोनाबाधित पोलिसांची संख्या हजाराच्या वर पोहोचली आहे. राज्यातील करोनाबाधितांमध्ये १००हून अधिक पोलीस अधिकारी आणि ९०० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. खबरदारी म्हणून गेल्या महिन्यापासून मुंबई पोलीस दलातील ५५ वर्षांवरील पोलिसांना रजेवर पाठवण्यात आले आहे. शिवाय ज्या पोलिसांना आजार आहेत, त्यांनाही रजा घेण्यास सांगितले आहे. सर्वाधिक करोनाबाधित असलेल्या मुंबईत अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांनाही कोरोना आपली शिकार बनवत आहे. मुंबई पोलिस दलातील आयपीएस अधिकारी असलेले दोन अतिरिक्त अधिकारी कोरोनामुळे आजारी असून दोन पोलिस उपायुक्त सध्या विलगीकरण आहेत. करोनाबाधित पोलिसांच्या संपर्कात आल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना रुग्णनिवेदनावर जावे लागत आहे. वरिष्ठ अधिकारी आजारी पडत असल्याने पोलिसही धास्तावले आहेत.
मुंबईप्रमाणे राज्यात इतर भागातही करोनाने पोलिसांना विळखा घातला असून १०६१ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये ११२ अधिकारी आणि ९४९ कर्मचारी यांचा समावेश आहे. ८७८ पोलिसांवर अद्यापही उपचार सुरू असून १७४ पोलिस बरे होऊन घरी परतले आहेत. सॅनिटायझर, मास्क, ५५ वर्षांवरील आणि आजार असलेल्या पोलिसांना कार्यालयीन ड्युटी अशा प्रकारची सावधगिरी घेऊनही पोलिसांना मोठ्या प्रमाणात लागण होत आहे. पोलिसांना लागण झाल्याची झळ त्यांच्या कुटुंबीयांना बसत असून बुधवारी मुंबईत एका पोलिसाच्या आईचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे.