#CoronaVirusEffect : निराधार प्रवाशांच्या आयुष्याची होरपळ , उत्तर प्रदेशात २३ मजुरांचा करुण अंत

21 labourers dead and several injured after the truck they were travelling in, collided with another truck in Auraiya. The injured have been shifted to hospital. They were coming from Rajasthan. pic.twitter.com/8l0QcH93Su
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 16, 2020
औरंगाबादच्या कर्मदजवळ रेल्वेखाली मरण पावलेल्या १६ लोकांच्या अपघातानंतर उत्तर प्रदेशमधील औरैयामधून गावी परतणाऱ्या मजुरांच्या ट्रकला भीषण अपघात होऊन या अपघातात 23 मजुरांचा मृत्यू झाला असून 15 जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात कोतवाली परिसरातील मिहौली राष्ट्रीय महामार्गावर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकमध्ये असलेले सर्व मजूर दिल्लीहून गोरखपूरला जात होते. आज गाजियाबाद आणि नोएडामधून मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी ट्रेनही चालवण्यात येणार आहेत. परंतु, तरिही मजूर आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारकडून मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन्स सुरु करण्यात आल्या आहेत. पण हे प्रवासी मजूर कोणत्याही सरकारचे ऐकायला तयार नाहीत.
दरम्यान, कालही उत्तर प्रदेशातील जालोन जिल्ह्यातही मजूर असलेल्या DCM गाडीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून 14 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. हे प्रवासी मजूर मुंबईहून परत येत होते. डीसीएममध्ये एकूण 46 प्रवासी मजूर होते. तर त्या आधीही तेलंगणातून उत्तर प्रदेशात येणाऱ्या ट्रकमधून येणाऱ्या प्रवाशांना अपघात होऊन सहा प्रवासी ठार झाले होते . विशेष कोणतेही नियोजन न करता , गेल्या 24 मार्चपासून देशात कोरोनाच्यापार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे देशातील सर्व सेवा ठप्प आहेत. त्यामुळे देशभरात अडकलेल्या मजुरांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. लॉकडाऊमुळे हातात काम नाही, तर खिशात पैसे नाही. त्यामुळे हे मजूर मिळेल त्या साधनाचा वापर करून आपल्या मूळ गावी परतण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात सध्या सुरु असलेलं स्थलांतर फाळणीनंतरचं सर्वात मोठं स्थलांतर असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, मजुरांच्या या स्थलांतरादरम्यान, अनेक भीषण अपघात होत आहे.
लॉकडाऊन दरम्यान, हायवेवर हृदय पिळवटून टाकणारं दृश्य पाहायला मिळत आहे. हातात काम नाही आणि खिशात पैसे नाहीत. त्यामुळे अनेक मजूर आपल्या घरी परतण्यासाठी पायी प्रवास करत आहेत. अनेक मन हेलावणारे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परिस्थिती एवढी गंभीर आहे की, मालवाहू गाड्या, ट्रकमध्ये मजूरांना भरण्यात येत आहे. स्थलांतर करणाऱ्या मजुरांमध्ये बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या मजुरांचा समावेश अधिक आहे. तसेच पंजाब आणि हरियाणामधूनही मजूर हजारो किलोमीटर पायी प्रवास करुन आपल्या घरी परतण्यासाठी धडपडत आहेत.