#CoronaEffect : प्रवासी मजूर आणि सामान्य नागरिकांसाठीही आता २२ मे पासून धावतील रेल्वे , १५ पासून ऑनलाईन बुकिंग….

देशात खूप चर्चा झाल्यानंतर आता स्थलांतरीत मजूर आणि कामगारांसाठी श्रमिक विशेष ट्रेन आणि त्यानंतर उच्चवर्गीय नागरिकांसाठी १२ मे पासून विशेष राजधानी ट्रेन चालवण्यात येत आहेत आणि त्यानंतर आता रेल्वे मंत्रालय मध्यम वर्गासाठी देशात मेल, एक्स्प्रेस विशेष ट्रेन चालवण्याची तयारी करत आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने बुधवारी अधिकृतपणे सर्क्युलरही जारी केले आहे. या गाड्यांसाठी वेटिंग तिकीटही असणार आहे. पण तात्काळ आणि प्रिमियम तात्काळ हे तिकीट मिळणार नाही. या गाड्या २२ मेपासून चालवल्या जातील. या ट्रेनमधील प्रवासासाठी तिकीट बुकिंग १५ मेपासून सुरू होणार आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून हे बुकिंग केले जाईल.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार श्रमिक आणि राजधानी विशेष ट्रेनच्या आधारावर आता मेल आणि एक्स्प्रेस या विशेष ट्रेनही चालवल्या जातील. यात शताब्दी आणि इंटर सिटी विशेष ट्रेनचाही समावेश होऊ शकतो. या गाड्यांसाठी तात्काळ तिकीटाची सुविधा नसेल. पण वेटिंग लिस्ट बनवली जाईल. या ट्रेनसाठी आरएसी तिकीट मिळणार नाही, असं रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. मेल, एक्स्प्रेस विशेष ट्रेनमध्ये फर्स्ट एसी या एग्झिक्युटीव्ह क्लाससाठी वेटिंगची २० तिकीटं तर एसी २ क्लाससाठी ५० तिकीटं आणि एसी ३ क्लाससाठी १०० वेटिंगची लिस्ट असेल. स्लीपर क्लाससाठी वेटिंग लिस्ट ही २०० तिकीटांची असेल. या ट्रेनसाठी तिकीट बुकींग १५ मे पासून सुरू होईल. तर या विशेष ट्रेन २२ मे पासून धावतील. कुठल्या मार्गांवर या ट्रेन चालवण्यात येतील, याची घोषणा नंतर करण्यात येणार आहे. १२ मे पासून १५ राजधानी विशेष ट्रेन सुरू झाल्या आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून या गाड्या धावत आहेत. डिब्रुगढ, अगरतळा, हावडा, पटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, तिरुवनंतपूरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू-तवी या मार्गावर या विशेष ट्रेन धावत आहेत.