Aurangabad News Update : कोरोना इफेक्ट : बंदोबस्तासाठी महसूल कर्मचारी उभे करा, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

औरंगाबाद – शहरातील कोरोना प्रादुर्भावामुळे ज्या ठिकाणी गरज नसेल अशा ठिकाणी अत्यंत तणावाखाली तैनात असलेल्या पोलिस कर्मचार्यांऐवजी महसूल खात्यातील ५०पेक्षा वयाने कमी असलेल्या अधिकारी कर्मचार्यांना बंदोबस्त सोपवा असा आदेश न्यायमूर्ती रविंद्र घुगे यांनी पोलिसआयुक्तालयाला दिला आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे घडत असलेल्या घटनाक्रमाचे निरीक्षण करण्यासाठी एक महिन्यापूर्वी या संदर्भात मुंबई उच्चन्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुमोटो याचिका दाखल झाली होती. या याचिकेच्या माध्यमातून खंडपीठाने निरीक्षणानंतर काही आदेश बजावले आहेत. त्यामधे शिल्पा हिवाळे प्रकरणात सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे.त्याऐवजी दखलपात्र गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे असे निरीक्षण नोंदवले. कोरोना वाॅरियर्सवर होत असलेले हल्ले, मानसिक त्रास या प्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई करावी असे आदेशात म्हटले आहे. त्याच प्रमाणे संचारबंदीच्या काळात नागरिकांना विनाकारण फिरल्या प्रकरणी मारहाण न करता कडक गुन्हे दाखल करा.तसेच शहरातील बर्याच वसाहती इतर लोकांनी प्रवेश करु नये म्हणून लाकडी बल्ल्या व पत्रे लावून जे अडथळे निर्माण केले ते बेकायदेशीर आहेत.त्यासंदर्भात अडथळे पोलिसांनी दूर करावेत. असे आदेशात शेवटी म्हटले आहे.