#CoronaVirusMaharashtra : ताजी बातमी : महाराष्ट्र 17974 , मुंबई 11394, पुणे 1899, मालेगाव 432 , औरंगाबाद 400 जाणून घ्या आपल्या जिल्ह्याची माहिती …

गेल्या २४ तासांत राज्यात ४३ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून त्यात मुंबईतील २४ रुग्णांचा समावेश आहे. तर आज १, २१६ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १७ हजार ९७४ झाली आहे. राज्यात आज झालेल्या मृतांमध्ये मुंबईतील २४, पुणे शहरात ७, वसई-विरार महापालिका हद्दीतील ५, सोलापूर शहरातील २, अकोला, पालघर आणि औरंगाबाद शहरातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्याशिवाय मणिपूर आणि बिहारमधील प्रत्येकी एका जणाचा मुंबईत मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील एकूण करोनाबळीची संख्या ६९४ झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात गुरुवारी दिवसभरात नवीन १, २१६ रुग्णांची नोंद झाली असून, एका दिवसातील ही सर्वात मोठी आकडेवारी आहे. यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांचा आकडा १७, ९७४ वर पोहोचला आहे. तर आज झालेल्या मृतांमध्ये २४ पुरुष आणि १९ महिला आहेत. ६० वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील २५ मृत्यू आहेत, अशी माहिती टोपे यांनी रात्री उशिरा दिली.
मुंबईत आज दिवसभरात ५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ३ ते ५ मे या कालावधीत विविध प्रयोगशाळांत घेतलेल्या चाचण्यांचे नमुने प्राप्त होऊन त्यात करोनाचे १७० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण ६९२ नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या आता ११ हजार ३९४ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज १४८ रुग्ण करोनामुक्त झाले असून आतापर्यंत २ हजार ४३५ रुग्णांनी करोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत राज्यातून ३ हजार ३०१ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या राज्यात २ लाख १२ हजार ७४२ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून, १३ हजार ४९४ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. दिवसभरात २०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात १२ हजार ०२१ पथकांनी ५१.७६ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.
मुंबईत आज दिवसभरात करोनामुळे २५ रुग्ण दगावले असून मृतांचा एकूण आकडा आता ४३७ वर पोहचला आहे. मुंबईतील विविध रुग्णालयांत करोनाच्या ६९२ नवीन रुग्णांची भर पडली असून करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ११ हजार २१९ इतकी झाली आहे. राज्यात आणि देशातील एखाद्या पालिका हद्दीतील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाची लागण झालेले २५ रुग्ण दगावले आहेत. यापैकी १३ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत पावलेल्या २५ रुग्णांपैकी १३ रुग्ण पुरुष होते तर १२ रुग्ण महिला होत्या. ४० ते ६० वर्षे वयोगटातील १०, ६० वर्षांवरील १२ तर चाळीशीच्या आतले ३ रुग्ण दगावले आहेत.