#MaharashtraNewsUpdate : दिलासादायक बातमी : कुठे अडकले असाल तर आता तुम्हीही आपल्या घरी जाऊ शकाल , राज्य सरकार सोडत आहे तब्बल १० हजार बसेस….

परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी दिल्यानंतर लॉकडाऊन दरम्यान मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांसाठी दिलासादायक बातमी असून अशा लोकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी राज्य सरकारने तब्बल १० हजार एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सेवा मोफत देण्यात येणार असल्याचे राज्यात मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. लोकांना घरी सोडण्यासाठी लागणाऱ्या बसेस उपलब्ध करून देण्यास परिवहन मंत्र्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे यात कोणतीही आडकाठी आता नाही. सर्वांना सुरक्षितपणे घरी पोहचवण्याचा आमचा प्रयत्न राहिल, असेही वडेट्टीवार म्हणाले.
याविषयी अधिक माहिती देताना वडेट्टीवार यांनी म्हटले कि , लॉकडाऊन व संचारबंदीमुळे अनेक लोक घरापासून दूरवर अडकले आहेत. मुंबई, पुण्यासह विविध जिल्ह्यांत विद्यार्थी, मजूर, नातेवाईकांकडे गेलेले लोक मोठ्या प्रमाणात अडकले असून या सर्वांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी सरकारने एसटी बसेसची व्यवस्था केली आहे. पुढील चार ते पाच दिवसांत या सर्वांना त्यांच्या जिल्ह्यात सोडले जाणार आहे. या सर्वांसाठी १० हजार एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. साठी सुमारे २० कोटी रुपये खर्च अपेक्षात आहे. प्रवासखर्चाचा हा भार मदत व पुनर्वसन विभाग उचलणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून केली जाणार आहे, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या व ग्रीन झोनमध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये हळूहळू जनजीवन सामान्य करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात ग्रीन झोन असलेल्या गोंदिया जिल्ह्यात तर आजपासून पुन्हा एकदा एसटी बस रस्त्यावर धावू लागली आहे. जिल्ह्यात मर्यादित एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला २५ फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ही सेवा सुरू करण्यात आली असून प्रवासी संख्या पाहून फेऱ्या वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.जवळपास दीड महिन्यानंतर एसटी सेवा सुरू झाल्याने गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.