#CoronoaVirusEffect : तळीरामांसाठी काय आहेत नियम , प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्वच झोन मध्ये अशी घेता येईल दारू ….

देशात आणि राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू झाल्यांनतर दारूची दुकानेही बंद झाल्यामुळे दारू पिणारांची मोठी अडचण झाली होती दरम्यान केन्द्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी टाळेबंदीची मुदत १७ मेपर्यंत दोन आठवडय़ांसाठी वाढवण्याची घोषणा करतानाच, हरित व नारिंगी क्षेत्रांमधील अनेक निर्बंध उठवले होते. ४ मेपासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन व ऑरेंज क्षेत्रांमध्ये केशकर्तनालये आणि सलून उघडण्यास परवानगी दिली आहे. तसेच तिन्ही क्षेत्रांत मद्यविक्रीस मुभा देण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी लॉकडाउनची घोषणा केली होती. लॉकडाउन च्या दोन्ही टप्प्यात मद्यविक्रीवर बंदी होती. मात्र, ४ मे पासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्यात मद्यविक्रीला सशर्त परवाना देण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं योग्य पालन केलं तर मद्यविक्रीची दुकानं सुरु केली जाऊ शकतात असे संकेत दिले होते. ग्रीन , ऑरेंज आणि रेड या तिन्ही क्षेत्रांमध्ये, बाजारपेठा व मॉलमध्ये नसलेल्या, स्वतंत्र अशा दारूच्या दुकानांना परवानगी राहणार आहे. यात ग्राहकांना एकमेकांपासून ६ फुटांचे अंतर राखावे लागणार आहे, तसेच एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत हेही सुनिश्चित करावे लागणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये (प्रतिबंधित क्षेत्र ) मद्यविक्रीस बंदी ठेवण्यात आली आहे.
दरम्यान लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर देशात सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्व राज्यांनी लॉकडाउनची कडक अमलबजावणी केल्यानं या काळात मद्यपींची दारुसाठी चांगली दैना झाली होती . केरळमध्ये तर मद्यपी आत्महत्या करत असल्याच्याही घटना समोर आल्या. त्यानंतर केरळ सरकारनं व्यसन जडलेल्या मद्यपींना डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन असेल तर दारु देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, देशभरात दारू विक्री बंदच होती. विशेष म्हणजे या काळात अवैध मार्गानं होणारी दारू विकणाऱ्यांवरही धाडी टाकण्यात आल्या. तर दारूची दुकाने फोडल्याच्या घटना अनेक ठिकाणी वाढल्या होत्या.
राज्यसरकारच्या निर्णय
लॉकडाऊनच्या काळात रेड झोनमध्ये समावेश असलेल्या मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यांतील कन्टेंन्मेट क्षेत्र वगळता उर्वरित भागांत स्वतंत्र दुकानांसह दारुची दुकानंही खुली होणार आहेत. राज्य सरकारने यासंबंधी निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळं मद्यप्रेमींना दिलासा मिळाला आहे. करोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळं केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १७ मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. त्याचवेळी सरकारनं रेड, ऑरेंज, ग्रीन अशा श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. महाराष्ट्रात १४ जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. या रेड झोनमधील दुकानं उद्यापासून खुली होणार आहेत. मुंबई आणि पुणे महानगर क्षेत्रासह इतर जिल्ह्यांतील कन्टेंन्मेंट क्षेत्र वगळता दारूची दुकानंही खुली होणार असून, विक्रीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
असे असतील नियम
रेड झोनमधील कन्टेंन्मेंट क्षेत्रात दारू दुकाने खुली ठेवण्यात अजिबात परवानगी नाही.
स्वतंत्र मद्याची दुकानं खुली ठेवता येणार आहेत. रेस्तराँ किंवा मॉलमधील दारूची दुकानं खुली ठेवता येणार नाहीत.
प्रत्येक लेनमध्ये केवळ पाच दुकाने (जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता, माल आणि बाजारपेठांमधील नाहीत.) खुली ठेवण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
जीवनावश्यक वस्तूंची दुकानं खुली ठेवण्यावर बंधन नाही. सर्वच दुकानदारांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागेल.
सलून, स्पा मात्र खुले ठेवता येणार नाहीत.
परिस्थितीनुसार, स्थानिक प्रशासनांनी त्यांच्या पातळीवर दुकाने खुली ठेवण्याच्या वेळा निश्चित करावयाच्या आहेत.