#CoronaVirusEffect : लॉकडाऊनच्या वाढीव कालावधीसाठी राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी

राज्यात लॉकडाऊनचा कालावधी १७ मे २०२० पर्यंत वाढविणे तसेच या काळात करावयाच्या उपायांच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांसंदर्भात आज राज्य शासनामार्फत आदेश जारी करण्यात आला. रेड (हॉटस्पॉट),ग्रीन आणि ऑरेंज झोन मधील धोक्यांची तीव्रता लक्षात घेऊन या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल. काही भागांमध्ये कामांसाठी परवानगी देण्यात आली असली तरी त्यांना कोविड १९ प्रादुर्भावापासून सुरक्षित राहण्यासाठीचे नियम मात्र काटेकोरपणे पाळावे लागतील.
लॉकडाऊन संदर्भातील सर्वसमावेशक अधिसूचना वाचण्यासाठी क्लिक करा
केंद्र शासनाचा १ मे २०२० रोजीचा आदेश आणि राज्य शासनाने यासंदर्भात वेळोवेळी काढलेल्या आदेशास अनुसरुन पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
● ४ मे २०२० पासून पुढे २ आठवडे लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात येत आहे.
● संबंधित जिल्ह्यातील कोविड १९ विषाणूच्या धोक्याचे स्वरुप (रिस्क प्रोफाईल) लक्षात घेऊन अनुसरुन जिल्ह्यांचे रेड (हॉटस्पॉट), ग्रीन आणि ऑरेंज झोन निश्चित करण्यासंदर्भातील निकष पुढीलप्रमाणे असतील.
● ज्या जिल्ह्यामध्ये एकही रुग्ण नाही किंवा ज्या जिल्ह्यामध्ये मागील २१ दिवसात एकही रुग्ण आढळला नाहीअशा जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात येईल.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुनिश्चित केल्याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या लक्षात घेऊन तसेच रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा दर आदी निकषानुसार रेड झोन किंवा हॉटस्पॉट जिल्हा निश्चित करण्यात येईल. जो जिल्हा ग्रीन किंवा रेड झोनमध्ये नाही तो जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असेल.
● आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय हे ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन जिल्ह्यांची यादी आणि संबंधित माहिती राज्यांना वेळोवेळी देतील. जिल्हाधिकारी यांच्या पातळीवरील पडताळणीनंतर आणि कोव्हीड १९ च्या प्रसाराचा प्रभाव पाहून रेड आणि ऑरेंज झोन समाविष्ट करु शकतील.
● रेड झोनमध्ये समाविष्ट एखाद्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यातील महापालिका क्षेत्राबाहेरील भागात मागील २१ दिवसात एकही रुग्ण आढळलेला नसल्यास तो भाग ऑरेंज झोन समजण्यात येईल. तथापि, या भागात कोरोना प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. ऑरेंज झोनमध्ये समाविष्ट एखाद्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यातील महापालिका क्षेत्राबाहेरील भागात मागील २१ दिवसात एकही रुग्ण आढळलेला नसल्यास तो भाग ग्रीन झोन समजण्यात येईल. तथापी, या भागात कोरोना प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. महापालिका क्षेत्राबाहेर मागील २१ दिवसात १ किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळले असल्यास हा भाग जिल्ह्यांच्या वर्गवारीनुसार रेड किंवा ऑरेंज झोन समजण्यात येईल.
● झोनचे वर्गीकरण करताना, रुग्णांची नोंद ही त्यांच्यावर जिथे उपचार सुरु आहेत त्या ठिकाणापेक्षा ते जिथे आढळले तिथे करण्यात येईल.