#PoliticsOfMaharashtra : मोठी बातमी : मोदी -शहांची शिष्टाई , उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला , निवडणूक आयोगाची निवडणूक घेण्यास संमती

Election Commission of India (ECI) grants permission for holding elections to the Legislative Council (MLCs) in Maharashtra. The necessary guidelines will need to be ensured for safety against #COVID19 during the elections pic.twitter.com/teikSwVdyi
— ANI (@ANI) May 1, 2020
अखेर महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे मात्र ही परवानगी देताना आयोगाने करोनाबाबत काळजी घेण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. या निर्णयामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीसंदर्भातला राजकीय पेच आता संपुष्टात येणार आहे. महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणुका होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. लवकरच या निवडणुकीचा पूर्ण कार्यक्रम घोषित होणार आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीखही जाहीर केली आहे. येत्या २१ मे रोजी मुंबईत ही निवडणूक होणार आहे.
दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीच्या पक्षांनी विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या ९ जागांसाठी निवडणुका घेण्याबाबत आयोगाला विनंती करणारे पत्र पाठवले होते. मुख्य सचिव अजोय मेहता यांनीही तशी विनंती केली, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निवडणुका घेण्याबाबतची विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली होती.
या विषयावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते . याबाबत कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवू नये म्हणून स्वतः उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलल्यामुळे कोरोनाच्या काळात देश आणि महाराष्ट्र संकटात असताना नसते आरोप नको , निवडणूक आयोगालाच जागे करणे योग्य राहील असा शहाणपणाचा निर्णय मोदी -शहा यांनी घेतल्यामुळेच हा प्रश्न निकालात निघाला असणार हे नक्की . सर्व काही वरिष्ठ पातळीवर ठरल्यानंतर शिवसेनेचे गटनेते आणि मंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ही याबाबतची पत्रे राज्यपालांपर्यंत पोहोचवली होती तर राज्यपाल कोश्यारी यांनीही निवडणूक आयोगाला या विधानपरिषद निवडणूक घेणे किती आवश्यक आहे हे सांगितले होते. त्यानंतर आज सकाळी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
देशाच्या निवडणूक आयोगाने
महाराष्ट्रातील रखडलेल्या विधान परिषद निवडणूका घेण्यास परवानगी दिली आहे.
या मुळे राज्यात निर्माण झालेले राजकीय अनिश्चिततेचया वातावरणाचा धुरळा खाली बसेल.
महाराष्ट्राची पुण्याई मोठी. महणून महाराष्ट्र दिन हा निर्णय आला.केन्द्र सरकारचे आभार.
सत्य मेव जयते!— Sanjay Raut (@rautsanjay61) May 1, 2020
खा . संजय राऊत यांनी मानले सर्वांचे आभार
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली असून आयोगाच्या या निर्णयाचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे. आज महाराष्ट्र दिन आहे आणि निवडणूक आयोगानं विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. महाराष्ट्राची मोठी पुण्याई म्हणून महाराष्ट्र दिनीच हा निर्णय झाला. हा महाराष्ट्रासाठी शुभ संकेत आहे, असं सांगतानाच काल काय झालं हे महत्त्वाचं नाही. आजपासून नवा अध्याय सुरू झाला आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन संकटाचा सामना करण्याची ही वेळ आहे. काल काय झालं हे महत्त्वाचं नसून आजपासून नवा अध्याय सुरू झाला आहे, असं राऊत म्हणाले.
करोनामुळे राज्यात आणि देशात चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे राज्यात अस्थिरता असणं योग्य नव्हतं. कोणत्याही राज्यात अशा वातावरणात अस्थिरता असू नये. महाराष्ट्रात तर ही अस्थिरता परवडणारीही नव्हती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वत: पुढाकार घेऊन निवडणूक आयोगाला विधान परिषदेच्या निवडणुका घ्यायला सांगितल्या. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आता या घटनेचं कुणीही राजकारण करू नये. ही वेळ राजकारण करण्याची नाही, तर एकमेकांना सांभाळून घेण्याची आहे. उद्धव ठाकरे हेच पाच वर्ष मुख्यमंत्री राहणार आहेत. मग कशासाठी राजकीय खेळ करायचा? असा सवाल करताना राऊत म्हणाले महाराष्ट्राची पुण्याई मोठी. म्हणून महाराष्ट्र दिनी हा निर्णय आला, असं सांगतानाच राऊत यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाचेही आभार मानले आहेत.
भाजपकडूनही निवडणूक आयोगाचे स्वागत
दरम्यान काल या विषयावरून भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिल्यानंतर आज भाजपच्या वतीने बोलताना आशिष शेलार म्हणाले कि , संवादातूनच मार्ग निघतो. प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची गरज नसते. हे आजच्या घटनेतून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे यापुढेही संवादाचाच मार्ग अवलंबला गेला पाहिजे असा टोला शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाचं शेलार यांनीही स्वागत केलं आहे.