#CoronaEffect : शैक्षणिक क्षेत्रात होतो आहे मोठा बदल : विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षांबाबत आल्या “या” शिफारशी….

राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे महाविद्यालयीन विदयार्थ्यांच्या परीक्षा रखडल्या आहेत. या बाबत निर्णय घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने दोन स्वतंत्र समित्यांची नियुक्ती केली होती. या पैकी एका समितीचे चेअरमन हरियाणा येथील केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्रा . आर . सी . कुहाड असून त्यांच्यावर विद्यापीठस्तरावरील सर्व परीक्षा , अकॅडमिक कॅलेंडर या संदर्भात अहवाल सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली असून दुसरी समिती इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली असून महाविद्यालयीन स्तरावरील ऑनलाईन शिक्षणाबाबत ते सूचना करणार आहेत.
या दोन्हीही समित्यांनी केलेल्या शिफारशी नंतर विद्यापीठ अनुदान अयोग्य विविध राज्यांना याबाबत सूचना देणार असल्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले होते. त्यानुसार या दोन्हीही समित्यांनी युजीसीकडे आपल्या शिफारशी पाठविल्या असून त्यापैकी कुहाड यांच्या समितीने विद्यापीठांच्या रखडलेल्या परीक्षा १ ते ३१ जुलै या कालावधीत घेण्यात याव्यात अशी शिफारस केल्याचे वृत्त आहे. या शिफारशीनंतर यासंदर्भात नियोजन सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान समितीने केलेल्या शिफारशी नुसार विद्यापीठांनी परीक्षा घेताना बहुपर्यायी, ओएमआर आधारित परीक्षा, ओपन बुक परीक्षा, प्रकल्पाधारीत परीक्षा या पर्यायांची वापर करावा. यासोबतच ७० गुणांची परीक्षा विद्यापीठाने घ्यावी, तर ३० गुणांची परीक्षा अंतर्गत मूल्यमापनाद्वारे घ्यावी, अशी शिफारसही यात करण्यात आली आहे. त्यानंतर १ ऑगस्टपासून अॅडमिशन प्रोसेस सुरू करावी आणि सप्टेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात यावं अशी शिफारस करण्यात आली आहे. यंदा विद्यार्थ्यांना हिवाळ्यात दिवाळी आणि ख्रिसमससाठी दिली जाणारी सुट्टी रद्द होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. कोरोनामुळे महाविद्यालयातील परीक्षा आणि प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्यामुळे शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होणार आहे. अभ्यासक्रम वेळेत पूर्ण व्हावा यासाठी दिल्या जाणाऱ्या मोठ्या सुट्ट्या रद्द होणार का? असाही प्रश्न आहे.
यंदा पहिल्यांदाच शैक्षणिक वर्ष जून ते जून न राहात सप्टेंबर ते जुलै असे ठेवण्यात यावे अशी शिफारस करण्यात आली आहे. १ ते ३१ ऑगस्टपर्यंत महाविद्यालयीन अंतर्गत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून सप्टेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करावी. टर्म परीक्षा १ जानेवारी ते २५ जानेवारी २०२१ तर वार्षिक परीक्षा १ ते ३१ जुलै २०२१ अशी घेण्यात येईल अशी शिफारस समितीकडून करण्यात आली आहे.