Aurangabad Update : भावाशी प्रॉपर्टीचा वाद ; दिवाणदेवडीत वकिलाची आत्महत्या

भावाशी प्रॉपर्टीचा वाद असल्याच्या कारणावरुन वकिलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दिवाणदेवडी भागात उघडकीस आली. मयूर राजेश भट (२८, रा. हरिओम हॉस्पीटलसमोर, एन-१, सिडको) असे मृत वकिलाचे नाव आहे. त्याच्या खोलीत पोलिसांना सुसाईड नोट आढळून आली आहे. त्या अनुषंगाने सिटीचौक पोलिस पुढील तपास करत आहेत.
मयूर भट यांचे सिडको, एन-१ आणि दिवाणदेवडी अशा ठिकाणी घरे आहेत. दिवाणदेवडीतील घराच्या खालच्या मजल्यावर भट यांचे काका राहतात. तीन दिवसांपुर्वी पत्नीशी भांडण झाल्याने ते दिवाणदेवडीतील घरात राहायला आले होते. सध्या कोरोनामुळे गरजूंना माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या वतीने अन्नदान केले जात आहे. तेथून जेवण घेत भट हे पोटाची भूक भागवत होते. याचदरम्यान त्यांनी फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुर्गंधी सुटल्याने आज सकाळी नागरिकांनी घटनेची माहिती सिटीचौक पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी धाव घेऊन कुजलेल्या अवस्थेतील भट यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत नेला. यावेळी भट यांच्या खोलीतून पोलिसांनी सुसाईड नोट हस्तगत केली. त्यात भावाशी प्रॉपर्टीचा वाद असल्याने आत्महत्या करत असल्याचे भट यांनी नमूद केल्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले. याप्रकरणाचा पुढील तपास जमादार ए. पी. देशमुख करत आहेत.