#CoronaLatestUpdate : धक्कादायक : औरंगाबादेत ६व्या रुग्णाचा मृत्यू , SRPF च्या जवानांना कोरोना, नांदेडमध्ये दुसरा रुग्ण तर पुण्यात ५५ रुग्णांची वाढ…

किलेअर्कमधील ६० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा घाटीमध्ये मृत्यू
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २५ रोजी दाखल करण्यात आलेल्या ६० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा आज (दि.२७ रोजी) दुपारी १२.३०वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी कळवले आहे. लेफ्ट साईडेड न्यूमोनायटिस विथ डायबेटिस विथ हायपरटेंशन विथ हायपोथायरॉडीझम या आजारामुळे या रुग्णास घाटीत २५ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. २५ एप्रिल रोजीच त्यांचा स्वॅब घेण्यात आला व त्याच दिवशी त्यांचा कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. घाटीतील उपचारादरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांचे मृत्यूचे कारण बायलॅटरल न्युमोनाटीस विथ ऍ़क्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिन्ड्रोम ड्यू टू कोविड 19 इन केस ऑफ डायबेटिस मलायटस टाइप टू विथ डायबेटिक नेफ्रोपॅथी, हायपरटेंशन, इस्चेमिक हार्ट डिसिज विथ हायपोथयरॉडिझम असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे. प्रसिद्धी पत्रकावर घाटीच्या अधिष्ठाता डॉ.येळीकर यांच्यासह माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांच्या स्वाक्षरी आहेत.
मालेगावात एसआरपीएफच्या ४ जवानांना कोरोना
राज्यात कमी अधिक प्रमाणात आज कोरोना पॉझिटिव्हच्या केसेस आढळत आहेत . दरम्यान मालेगाव येथून बंदोबस्तावरून परत आलेल्या हिंगोलीच्या राज्य राखीव पोलिस दलाच्या विलागीकरण कक्षात ठेवलेल्या आणखी चार जवानांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ११ झाली आहे. कोविड पॉझिटिव्ह जवानांची संख्या एकूण १० झाली आहे. हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारामधील अधिकारी व जवान मालेगाव व मुंबई येथून बंदोबस्त आटोपून हिंगोलीमध्ये परतले होते. या १९४ अधिकारी व जवानांच्या घशातील लाळेचे नमुने तपासणीसाठी संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले होते. यापैकी सहा जणांना करोनाची लागण झाल्याचा तपासणी अहवाल २१ एप्रिल रोजी प्राप्त झाला होता.
दरम्यान, एसआरपीच्या विलगीकरण कक्षात ठेवलेल्या ४ जवानांचा पहिला थ्रोट स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, चार जवानांना जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करून त्यांचे दुसऱ्यांदा थ्रोट स्वॅब घेण्यात आले होते. आज २७ एप्रिल रोजी या चार जवानांचा तपासणी अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास व वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.
नांदेड येथे आढळला दुसरा रुग्ण…
नांदेड शहरात अबचलनगर भागातील ४४ वर्षीय करोना संशयित रुग्णाचा अहवाल २६ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला आहे. त्या रुग्णावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत. नांदेड शहरातील अबचलनगर हा भाग कंटेनमेंट झोन (अटकाव) म्हणून सील करण्यात आला आहे.
पुण्यात ५५ रुग्णांची वाढ
राज्यात गेल्या काही काही दिवसांपासून रुग्ण तपासणी आणि चाचणी सुविधामध्ये वाढ केल्याने पुण्यातील रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. काल रात्रभरात पुण्यात ५५ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून त्यामुळे आता पुण्यातील करोना रुग्णांची संख्या १३१९वर पोहोचली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात काल रात्रीपासून सकाळपर्यंत ५५ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे काल जिल्ह्यातील रुग्णसंख्या १२६४ वर पोहोचली होती, ही संख्या आता १३१९वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण तपासणी आणि चाचणी सुविधामध्ये वाढ केल्याने ही आकडेवारी वाढल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात ७० ते १०० पर्यंत रुग्ण संख्या वाढत आहे. आज संध्याकाळपर्यंत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं सूत्रांनी सांगितलं.
दोन महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू
पुण्यातील ससून रुग्णालयात करोनावर उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांचा आज मृत्यू झाला. करोनामुळे आज दगावलेल्यांमध्ये दोन महिलांचा आणि एका पुरुषाचा समावेश असून या रुग्णांना इतरही आजार होते, असं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं. तीन करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने पुण्यातील करोनामुळे दगावलेल्यांची संख्या ८४वर पोहोचली आहे.
घोरपडी गावातील ६४ वर्षाच्या एका महिलेला १८ एप्रिलपासून करोनाची लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्यांना २३ एप्रिल रोजी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना रक्तदाब, मधुमेहाचाही त्रास असल्याने काल रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. तर पर्वती येथील एका ४८ वर्षीय महिलेला १६ एप्रिल रोजी करोनाची लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्यांना १८ एप्रिल रोजी ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या तपासणी अहवालात त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं होतं. या महिलेला रक्तदाब, मधुमेहासह लठ्ठपणा आणि हृदयविकाराचे आजार होते. त्यामुळे सोमवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला.
कोंढव्यातील ३८ वर्षाच्या एका पुरुषाचा देखील करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना २५ एप्रिल रोजी ससून रुग्णालयात दाखल करून त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यांची चाचणी आज सकाळीच पॉझिटिव्ह आली. आज सकाळी त्यांचा साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या रुग्णालाही मधुमेहासह मूत्रपिंडाचा आजार होता, असं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.
एक नजर
जळगाव जिल्ह्यात करोनाचा पाचावा बळी; अमळनेरमधील वृद्ध रुग्णाचा मृत्यू
भंडारा जिल्ह्यातही करोनाचा शिरकाव; गराडा इथं आढळली पहिली कोविड पॉझिटिव्ह महिला
मुंबईत संसर्ग सुरूच; आतापर्यंत ५४०७ रुग्ण तर, २०४ जणांचा मृत्यू
आग्रा येथे आढळले करोनाचे नवे १० रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या पोहोचली ३८१ वर.