#Maharashtra : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड रुग्णालयात दाखल…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले असून खबरदारीचा भाग म्हणून तपासणी करून घेण्यासाठी आव्हाड रुग्णालयात दाखल झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह राष्ट्रवादीकडूनही या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.मात्र आव्हाड यांना नेमके कशासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले हे कळू शकलेले नाही, असेही या वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान, आव्हाड यांच्या सुरक्षेतील काही पोलिसांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आव्हाड यांनी खबरदारी म्हणून स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतले होते. १३ एप्रिलपासून ते सेल्फ क्वारंटाइन आहेत. त्यांनी आपली करोना चाचणीही करून घेतली होती. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. याबाबत आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली होती. करोना चाचणीचा अहवालही त्यांनी ट्विटरवर पोस्ट केला होता.
धुळे जिल्ह्यात आढळले ५ नवे रुग्ण
नंदुरबार बरोबरच धुळे जिल्ह्यात मंगळवारी एकूण ५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात धुळे शहरात ४ जणांचा तर शिंदखेडा तालुक्यातील एका ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे. धुळे शहरातील चार रुग्णांचा वयोगट २० ते ४५ वर्षे या दरम्यानचा आहे. या सर्व रुग्णांवर भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
जळगावात २ पॉझिटिव्ह
जळगावातील कोविड रुग्णालयात सोमवारी घेण्यात आलेल्या करोना सदृष्य रुग्णांच्या नमुन्यांपैकी दोन रुग्णांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे. या करोनाबाधित रुग्णांपैकी एका ५२ वर्षीय महिलेचा सोमवारी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता तर दुसरा रुग्ण हा त्या महिलेचा पती असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.