#Maharashtra : #CoronaVirusUpdate : राज्यात आणखी ९ पोलिसांना कोरोनाची लागण, एकूण संख्या ४९, पोलीस बांधवांनो काळजी घ्या….

मुंबईतील डॉक्टर्स , नर्स आणि ५३ पत्रकारांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर विविध बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे वृत्त आहे. गेल्या १२ तासांमध्ये आणखी ९ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे एकूण पोलिसांची संख्या ४९ वर गेली आहे. यात ११ अधिकारी आणि ३८ जवानांचा समावेश आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर तैनात महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोना सदृष्य लक्षणं दिसून आली आहेत. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. मात्र त्याला घरीच आयसोलेशनमध्ये राहायला सांगण्यात आलं आहे. तर इतर सर्व कर्मचाऱ्यांचीही तपासणी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरच राहत असून वर्षा बंगल्यावर ते फक्त शासकीय बैठका आणि भेटीगाठी घेत होते. कोरोनाच्या प्रकोपानंतर त्यांनी फक्त मोजक्याच बैठका या वर्षावर घेतल्या होत्या. राजभवन, सह्याद्री गेस्ट हाऊस, मंत्रालय आणि इतर महत्त्वाच्या सर्व कार्यालयांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांनाही काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सॅनिटाजेशनचं काम सुरू आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्या आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार केल्या जात आहे. केंद्र सरकारने काही निकष लावून राज्याला रॅपिड टेस्ट करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात ७५ हजार चाचण्या केल्या जातील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.