Palghar Mob Lynching case : पालघर खून प्रकरणात अटक केलेल्यांमध्ये भाजपचेच कार्यकर्ते : सचिन सावंत यांचा आरोप

पालघर येथे घडलेल्या बहुचर्चित मॉब लिंचिंगच्या घटनेवरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांना व सल्ले देणाऱ्या विरोधकांवर काँग्रसेनं जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘पालघरच्या घटनेवरून भाजप धार्मिक राजकारण करण्याचा हीन प्रयत्न करत आहे. प्रत्यक्षात या प्रकरणात अटक झालेले बहुसंख्य लोक भाजपचे आहेत,’ असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येनंतर राजकारण तापले आहे. भाजपनं या घटनेवरून सरकारवर दोषारोप सुरू केले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून चिंता व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘मॉब लिंचिंगचे केंद्र असलेल्या यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन करणं हा शहाजोगपणा आहे. खरंतर गडचिंचले ग्रुप ग्रामपंचायत हा भाजपचा बालेकिल्ला असून तिथं गेली दहा वर्षे भाजपचा सरंपच आहे. सध्या भाजपच्या चित्रा चौधरी या सरपंच आहेत. लिंचिंगच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये बहुसंख्य भाजपचे लोक आहेत, असं सावंत यांनी म्हटलं आहे.
मॉबलिंचिंगचे केंद्र असलेल्या युपीचे मुख्यमंत्री @myogiadityanath शहाजोगपणे @OfficeofUT
ना फोन करतात. पण 'दिवशी गडचिंचले' ग्रुप ग्रामपंचायत हा #भाजप चा गड असून गेली १० वर्ष तिथे भाजपचा सरपंच आहे. सध्या भाजपाच्या चित्रा चौधरी या सरपंच आहेत. अटक केलेल्यांमध्ये बहुसंख्य भाजपाचे आहेत— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 20, 2020
सावंत यांनी पुढे म्हटले आहे कि , ‘काही मुस्लिम वेशांतर करून मुले पळवून किडनी काढतात वा विहिरीत थुंकून करोना पसरवतात, अशी अफवा पालघरमध्ये होती. अशा अफवांनी समाजाला हिंसक बनवण्याचे कारस्थान देशात आजवर कोण करतय? साधूंचा वेश पाहूनही मॉब थांबत नाही हे भयानक आहे. या अफवांमागे कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे,’ अशी मागणी सावंत यांनी केली आहे. ‘गेली ५ वर्षे भाजप सत्तेत असताना धुळ्यात झालेली वा वर्षभरापूर्वी पालघरलाच झालेल्या किंवा राज्यातील अन्य घटनांना पायबंद घालू न शकणारे आज यावर राजकारण करत आहेत हे गंभीर आहे’.