#CoronaVirusEffect : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रिजर्व बँकेचे मोठे निर्णय

It has been decided to provide special refinance facilities for an amount of Rs 50,000 crores to National Bank for Agriculture & Rural Development, Small Industries Development Bank of India, and National Housing Bank to enable them to meet sectoral credit needs: RBI Governor pic.twitter.com/THfzm2O4qm
— ANI (@ANI) April 17, 2020
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू असलेल्या भयंकर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून काही ठोस पावलं उचलण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमिवर आज आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या प्रत्येक घडामोडींबाबत आरबीआय सतर्क आहे. ते पुढे म्हणाले की, ‘या प्रसंगाशी सामना करण्यासाठी आवश्यक ते सर्वकाही करण्याचे आमचे मिशन आहे. आरबीआय या काळात खूप सतर्क आहे. प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आम्ही नवनवीन घोषणा करतो आहोत.’ गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अशी घोषणा केली की, ३० जूनपर्यंत बँकांना एनपीए घोषित करावा लागणार नाही. त्याचप्रमाणे बँकांना त्यांनी आवाहन केले आहे की, जास्तीत जास्त ग्राहकांना ईएमआयमध्ये सूट देण्यात यावी.
दरम्यान गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र रिव्हर्स रेपो रेट ०.२५ टक्क्यांनी कमी करून ३.७५ टक्के करण्यात आला आहे. नाबार्ड एनएचबी आणि सिडबीमध्ये आरबीआयने मोठा निर्णय घेतला आहे. या तिन्ही एजन्सींना रेपो रेटवर कर्ज मिळेल. एनएचबीला १० हजार कोटी, सीआयडीबीआयला १५ हजार कोटी तर नाबार्डला २५ हजार कोटी रुपये मिळतील. याकरता एकूण ५० हजारांचे पॅकेज आरबीआयकडून जाहीर करण्यात आले आहे. शेती आणि ग्रामीण विकासासाठी कर्ज देण्याचे काम नाबार्डकडून करण्यात येते तर सिडबी छोट्या उद्योगांसंबधीत तर एनएचबी गृहनिर्माण क्षेत्राशी संबधित अशा या बँका आहे. परिणामी या शेती, छोटे उद्योग आणि गृहनिर्माण क्षेत्राचे नुकसान होऊ नये याकरता ही घोषणा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ते म्हणाले की, 2020 हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी मंदीचे वर्ष आहे. मात्र तरीही जी-20 देशांमध्ये भारताची परिस्थिती चांगली राहील.
यावर्षी विकास दर 1.9 टक्के राहण्याची शक्यता दास यांनी व्यक्त केली आहे. आयएमएफच्या माहितीनुसार कोरोनाचे संकट संपल्यानंतर विकास दर 7.2 टक्क्यापर्यंत पोहोचू शकेल, अशी माहिती दास यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे जगभरात कच्च्याच तेलाच्या किंमतींची घसरण होत आहे. या सर्व घडामोडीं दरम्यान बँकेचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्याच्या प्रयत्नात आहोत, असंही ते म्हणाले. दास यांनी फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, पोलीस स्टाफ आणि इतर सेवा पुरवणाऱ्यांचे कौतुक केले. बँक आणि इतर फायनान्शिअल सेवा देणाऱ्या संस्थांच्या कामाचीही दास यांनी प्रशंसा केली.