Aurangabad News Update : झाल्टा फाटा येथे ट्रक पेटून ५० लाखांचे नुकसान

औरंंंगाबाद : जनावरांसाठी लागणारे शेंगदाण्याचे ढेप घेवून राजकोट येथून बंगलोरला जात असलेला ट्रक अचानकपणे पेटल्याने जळून खाक झाला. ट्रकला आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि.१७) पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास बीड बायपास रोडवरील झाल्टा फाटा येथे घडली. ट्रकला लागलेल्या आगीत ५० लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सुत्रांनी दिली आहे.
यश अब्दुल माणिक असगर, अहेमद मुसा समदाणी, दोघे राहणार, राजकोट, उत्तरप्रदेश हे दोघे शेंगदाण्याचे ढेप असलेला ट्रक घेवून राजकोट येथून बंगलोरकडे जात होते. शुक्रवारी पहाटे ढेपेने भरलेला ट्रक झाल्टा फाटा येथून जात असतांना अचानकपणे इंजिनमधुन धुर निघुन ट्रकला आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करीत ट्रकला आपल्या कावेत घेतले होते. ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी अशोक खांडेकर, पवार, शुभम आहेरकर, विशाल निंबाळकर, मदन ताठे, प्रविण पचलोरे, अक्षय नागरे, भुरालाल सलामपुरे, विनोद तुपे आदींनी घटनास्थळी धाव घेवून ट्रकला लागलेली आग विझवली.
दरम्यान, ट्रकला आग लागलेली पाहताच यश अब्दुल माणिक असगर, अहेमद मुसा समदाणी यांनी ट्रकमधुन उडी घेवून आपला जीव वाचवला. आगीत संपूर्ण ट्रक आणि ट्रकमधील शेंगदाण्याचे ढेप जळून खाक झाले. या घटनेची नोंद एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.