#CoronaVirusEffect : दिलासादायक बातमी : राज्यातील रुग्णांच्या संख्येत होतेय घट , जाणून घ्या ताजे अपडेट्स…

आज केंद्र शासनाच्यावतीने सकाळी ८ वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार देशभरतात कुरोनाग्रस्तांची संख्या १२,३८० इतकी झाली असून मृत्यूची संख्या ४१४ तर उपचारानंतर बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या १४८९ इतकी आहे. दोन दिवसांच्या तुलनेने काल कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा कमी झाल्याचे दिलासादायक वृत्त आहे. दरम्यान महाराष्ट्रातील सर्वात जास्त रुग्ण मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आहेत. राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात बुधवारी २३२ रुग्णांची भर पडली तर ९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या २९१६ झाली असून १८७ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत ५२००० तपासणी झाल्या असून त्यातील ४८ हजार १९८ तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सगळ्यात जास्त रुग्ण हे मुंबई आणि ठाण्यात आहेत. राज्यात ५ हजार ३९४ सर्व्हेक्षण पथकं काम करत असून त्यांनी आत्तापर्यंत २० लाख लोकांचा सर्व्हे केल्याची माहितीही आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
India's total number of #Coronavirus positive cases rises to 12,380 (including 10,477 active cases, 1489 cured/discharged/migrated and 414 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/wxRWRTCMp2
— ANI (@ANI) April 16, 2020
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये काल बुधवारी ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. काल करोनाचे १४० रुग्ण सापडले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ११ दिवसांतील करोना रुग्णांचा हा सर्वात कमी आकडा आहे. गेल्या आठवड्यात या व्हायरसमुळे रोज ९ ते १६ रुग्णांचा मृत्यू होत होता. मुंबईत आतापर्यंत ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सोमवारी ९ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या शुक्रवारपर्यंत मुंबईतील मृतांचा आकडा दोन अंकी होता. काल बुधवारी ही संख्या केवळ दोनवर आली आहे.
शोध मोहिमेचा सकारात्मक परिणाम
राज्य सरकारने राज्यात रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठीही विशेष मोहीम सुरु केली असून त्यानुसार केवळ एका दिवसात ७६ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. संपर्कातून करोना बाधित झालेले आतापर्यंत ८५७ रुग्ण सापडले आहेत. ज्या ठिकाणी रुग्ण सापडले तो परिसर आणि ते राहत असलेल्या ३३ हजार ६३६ इमारती आतापर्यंत सॅनिटाइज करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या माहितीनुसार मुंबईत आतापर्यंत १७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर राज्यात आतापर्यत १८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोनाची लागण होऊन राज्यात आतापर्यंत १८७ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत करोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला. त्यात मुंबईत दोन, पुण्यात सहा, अकोल्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला. सहा पुरुष व तीन महिलांचा त्यात समावेश आहे. या ९ रुग्णांपैकी ४ रुग्ण ६० वर्षावरील होते, तीन रुग्ण ४० ते ६० या वयोगटातील होते तर दोन रुग्ण ४० वर्षांखालील होते. ९ पैकी ६ रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा व हृदयरोग असे आजार आधीपासून होते. सध्या राज्यात ६९ हजार ७३८ जण होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ५ हजार ६१७ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत, असे त्यांनी नमूद केले.