#CoronaVirusEffect : लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलाबाबत ऊर्जामंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णय …

देश आणि राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे नागरिक त्रस्त झाले असून राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीजबिलासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मार्च आणि एप्रिल महिन्याचं वीजबिल भरण्यास मुदतवाढ देण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. ज्या वीजग्राहकांकडे मीटर रीडिंगची सोय आहे. त्यांनी स्वतःच मीटर रीडिंग पाठवण्याचे आवाहनही उर्जामंत्र्यांनी केले आहे.
ऊर्जा मंत्र्यांनी म्हटले आहे कि , महावितरणच्या घरगुती, व्यापारी, व्यावसायिक आणि इतर सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना मार्च आणि एप्रिल महिन्यांचं वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. सोबतच महावितरणच्या सर्व वीजग्राहकांनी त्यांच्या वीज मीटरचे स्वतः रिडींग घेऊन महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपद्वारे अपलोड करावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे. यामुळे वीजग्राहकांना अचूक मीटर रिडींगचं वीजबिल प्राप्त होईल. ज्या ग्राहकांकडे रिडींग उपलब्ध नसेल अशा घरगुतीसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सरासरी विजबिल पाठवण्यात येईल. त्यांचं बिल हे मागच्या काही महिन्याच्या सरासरीनुसार आकारण्यात येईल. आपल्या घरातल्या विजेचं रीडिंग स्वतःच घ्यावं आणि महावितरणला या वेबसाइटवर पाठवून द्यावं, असं सांगण्यात येत आहे. महावितरणच्या कन्झ्युमर पोर्टलवरून किंवा मोबाईल अॅपद्वारे वीजग्राहकांना मीटरचं रीडिंग अपलोड करण्याची सोय आहे. महावितरणच्या ग्राहकांनी स्वत:च मीटर रीडिंग घेऊन (सेल्फ मीटर रीडिंग) पाठवावे.
ऊर्जामंत्री डॉ राऊत यांच्या सूचनेप्रमाणे मार्च महिन्याचं बिल भरण्यास १५ मे तर एप्रिल-२०२० चे वीजबिल भरण्यासाठी ३१ मे ची अंतिम तारीख दिली आहे. यामुळे लॉकडाऊन काळात अडचणीत असलेल्या राज्यातील महावितरणच्या वीजग्राहकांना दिलासा मिळाला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे महावितरणकडून २३ मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटरचे रीडिंग घेणं बंद करण्यात आलं आहे. सोबतच वीजबिलांची छपाई आणि वितरण देखील बंद करण्यात आलं आहे. तसंच वीजबिल भरणा केंद्र देखील बंद आहेत. तसा SMS मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या राज्यातील २ कोटी १० लाखांपेक्षा अधिक वीजग्राहकांना पाठविण्यात येत आहे.
दरम्यान वीजग्राहकांनी स्वत:च मीटर रीडिंग घेऊन पाठविल्यास त्यांना प्रत्यक्ष वापरानुसार वीजबिल देणे शक्य होणार आहे. तसेच जे ग्राहक स्वत:चे मीटर रीडिंग पाठविणार नाही, त्यांना सरासरी वीजबिल पाठविण्यात येईल. पुढील कालावधीत महावितरणकडून प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेतल्यानंतर या ग्राहकांना अचूक वीजबिल आकारण्यात येईल व मागील सरासरी वीजबिलांचे समायोजन करण्यात येणार आहे. ‘लॉकडाऊन’मुळे मोबाईल क्रमांकांची नोंदणी केलेल्या ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे वीजबील पाठविण्यात येत आहे. याशिवाय वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर वीजबिल पाहण्यासाठी आणि भरणा करण्यासाठी उपलब्ध आहेत. लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावं, असे आवाहन ऊर्जामंत्र्यांनी केले आहे.