#CoronaVirusUpdate : राज्यांसह देशभरात वाढू लागले कोरोनाचे संकट , राज्यात १३४ वाढ तर देशातील रुग्णांची संख्या ८ हजाराच्या वर….

देशातील सर्व राज्यांसह महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसने थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात तब्बल १३४ रुग्णांची संख्या वाढ झाली आहे. यापैकी ११३ रुग्ण हे एकट्या मुंबईत आढळले आहेत. दरम्यान राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्याही १८९५ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात मुंबई, पुणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. दरम्यान भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८३५६ वर पोहोचली असल्याचे वृत्त आहे.
मुंबईच्या वरळी, कोळीवाडा, धारावी आणि उपनगरात नवे रुग्ण आढळले आहे. वसई आणि विरारनंतर आता मीरा भाईंदरमध्येही रुग्णांची संख्या वाढली आहे. आज सकाळपर्यंत मीरा भाईंदरमध्ये ७ नवे रुग्ण आढळले आहे. तर पुण्यात ४ रुग्ण आढळून आले. नवी मुंबई, ठाणे महापालिका, वसई विरार इथं प्रतेकी 2 रूग्णांची वाढ झाली आहे. तर रायगड, अमरावती, भिवंडीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात २४ तासांत ९०९ नवीन लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं रिपोर्टमधून समोर आलं आहे. तर अद्यापही २ हजार नागरिकांचे रिपोर्ट्स येणं बाकी आहे. धक्कादायक बाब म्हणजे, २४ तासांत कोरोनामुळे ३४ तर आतापर्यंत २७३ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत भारतात रुग्णांची संख्या ८३५६ वर पोहोचली आहे. त्यापैकी ७३६७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ७१६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.