#CoronaVirusEffect : काही असे काही तसे , खासगी डॉक्टरांची मानवतेला आणि कर्तव्याला तिलांजली , उपचार नाकारल्याने वृद्धाचा मृत्यू….

जगात , देशात आणि राज्यात कोरोना व्हायरसने केवळ लोकांच्याच नव्हे तर खासगी डॉक्टरांच्याही मनात दहशत निर्माण केली असून मुंबईत एका डॉक्टरच्याच सासऱ्यावर उपचार करण्यास अनेक खासगी डॉक्टरांनी नकार दिल्यामुळे या वृद्ध इसमाचा अखेर मृत्यू झाल्याचे वृत्त महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनने दिले आहे. विशेष म्हणजे शासनाने , मुख्यमंत्र्यांनी विनंती करूनही करोना संसर्गाच्या भीतीने खासगी रुग्णालयांकडून वैद्यकीय उपचार नाकारण्याचे प्रकार वाढत आहेत. एरवी सर्वसामान्य रुग्णांना हा अनुभव येतोच, मात्र गुरुवारी घाटकोपरमधील एका डॉक्टरलाही या वेदनादायी अनुभवाला सामोरे जावे लागले. डोंबिवलीमधील एका खासगी रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवा देणारे एक डॉक्टर घाटकोपर येथे राहतात. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या सासऱ्यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने त्यांच्यावर ज्या डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत, त्या डॉक्टरांकडे सदर रुग्णाला नेण्यात आले परंतु त्यांनी रुग्णाला रुग्णालयामध्ये दाखल करून घेण्यास नकार दिला.
या वृत्तानुसार संबंधित डॉक्टरांनी वारंवार विनंती करूनही त्यांच्या सासऱ्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले नाही. घाटकोपर आणि परिसरातील तीन ते चार रुग्णालयांमध्ये त्यांनी सासऱ्यांना उपचार द्या, अशी विनंती केली. मात्र या परिसरातील कोणत्याही रुग्णालयांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. काही ठिकाणी खाटा रिक्त नसल्याचे कारण देण्यात आले, तर काही ठिकाणी करोनाची चाचणी झाली आहे का, अशी विचारणा करण्यात आली. विशेष म्हणजे या डॉक्टरांनी यापूर्वी अनेकदा गरजू, अडलेल्या रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. स्वतः वैद्यकीय सेवा देताना त्यांनी कुणालाही नाकारले नाही, मात्र यानिमित्ताने त्यांच्यावरच अशी वेळ ओढावली आहे, डोंबिवलीतील खासगी रुग्णालयातील त्यांच्या सहकाऱ्यांना हि बाब कळवल्यावर, त्यांनी तिथे घेऊन येण्यास सांगितले. घाटकोपरहून तिथे पोहचण्यासाठी वेळ लागेल, हे पाहता राहत्या ठिकाणीच वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र अन्य कोणताच पर्याय नसल्याने शेवटी डोंबिवलीला नेण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. त्यावेळी मुलुंड येथे त्यांना अडवण्यात आले. पोलिसांना समजावण्यामध्येही २०-२५ मिनिटे गेली. अखेर रुग्णालयातून फोन आल्यानंतर त्यांना पुढे जाण्याची संमती देण्यात आली. डॉ. म्हात्रे डोंबिवलीतील ज्या खासगी रुग्णालयात काम करतात, त्या रुग्णालयामध्ये त्यांनी सासऱ्यांना दाखल केले. पण तोपर्यंत त्यांची प्रकृती खूपच खालावली होती.
दरम्यान शेवटी अखेरच्या क्षणी या रुग्णाला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, पण या सर्व विलंबात डॉक्टरांच्या सासऱ्यांचे निधन झाले. योग्यवेळी मदत मिळाली असती, तर त्यांचे प्राण वाचले असते, अशी खंत या रुग्णालयातील रुग्णाचे जावई आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी व्यक्त केली. दरम्यान कोणत्याही रुग्णाच्या जिवावर बेतत असताना केवळ करोनाच्या भितीने रुग्णांना नाकारू नका, असे आवाहन सरकारकडून वारंवार केले जात आहे. तरीही हे निर्देश पायदळी तुडवले जात असल्याचे या निमित्ताने समोर आले. या रुग्णाला दाखल करून घेतल्यानंतर करोनासाठी तपासणीही करण्यात आली, ती ‘निगेटीव्ह’ आली.