#CoronaVirusUpdate #धक्कादायक : काळजी घ्या : नातेवाईकांना मृतदेह दिला जाणार नाही, दफन -दहन शासनच करणार….

२४ तासांत देशात ३७ मृत्यू, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ६७६१ वर तर महाराष्ट्रात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १५७४
देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. २४ तासांत देशात ३७ मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात करोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत आत २१० नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १५७४ इतकी झाली आहे. आज दिवसभरात करोनाच्या १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, काहीशी दिलासा देणारी बाब म्हणजे राज्यात १८८ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. पुण्यात नगर जिल्ह्यातील एका ३० वर्षाच्या तरुणासह तीन करोनाग्रस्तांचा आज ससून रुग्णालयात मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली. आता पुण्यातील मृतांची संख्या २८ झाली आहे. दरम्यान, करोना संसर्गाने मृत्यू झाल्यास तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार नाही, असे विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
37 deaths, 896 new cases in last 24 hours, the sharpest ever increase in cases; India's total number of #Coronavirus positive cases rises to 6761 (including 6039 active cases, 516 cured/discharged/migrated and 206 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/HbQKf5BMPt
— ANI (@ANI) April 10, 2020
देशभरात कोरोनावरील नियंत्रणासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले असले तरी देशातील कोरोनाबाधिकांचा आकडा वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काळात लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत ओडिशा आणि पंजाब या दोन राज्यांनी लॉकडाऊनची मर्यादा वाढवून ३० एप्रिलपर्यंत केली आहे. दरम्यान आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २४ तासांत देशात ३७ जणांचा मृत्यू झाला असून ८९६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार आता देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ६७६१ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत २०६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५१६ रुग्ण उपचारानंतर स्वतःच्या घरी गेले आहेत.
नातेवाईकांना मृतदेह दिला जाणार नाही, दफन -दहन शासनच करणार : पुणे आयुक्तांचा निर्णय
याबाबत अधिक माहिती देताना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले कि , पुणे शहरासह जिल्ह्यात काल रात्रीपासून शुक्रवारी सायंकाळी पाचवाजेपर्यंत ३६ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यात पिंपरी चिंचवडमध्ये नव्याने चार जणांना लागण झाली आहे. पुणे शहर व जिल्ह्यांत आतापर्यंत एकूण २४५ जणांना करोनाची लागण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. करोनाबाधीत रुग्णाचे निधन झाल्यास संबधित रुग्णांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार नाहीत. त्या मृतदेहांवर गॅस किंवा विद्युत दाहिनीमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोरोनाबाधीत रुग्णाचा मृतदेह दफन करायचा असल्यास शहरापासून दूर अंतरावर सहा फूट खोल खड्डा खणून आणि त्यामध्ये निर्जंतूक लिक्विड टाकून मृतदेह प्लास्टिकच्या दोन बॅगांमध्ये घालून दफन केला जाणार आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
दरम्यान घराबाहेर पडताना तोंडावर मास्क लावणे पुण्यात बंधनकारक करण्यात आले आहे. त्याची माहिती देणारा व्हिडिओ पुणे पोलिसांनी तयार केला असून त्यामधून नागरिकांची जनजागृती केली जात आहे. – संचारबंदीच्या काळात रुग्णांना सेवा देण्यासाठी आपल्या खासगी क्लिनिकमध्ये जाणाऱ्या डॉक्टरांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना नाकाबंदीमध्ये अडवून ठेवू नका. डॉक्टरांचे ओळखपत्र पहावे तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांना संबधित डॉक्टरांनी दिलेले पत्र ग्राह्य धरून त्याची शहानिशा करून सोडावे, अशा सूचना वाहतूक विभागाचे अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिल्या आहेत.
पुण्याच्या मार्केट यार्डातील भाजीपाला, फळे, कांदा, बटाटा बाजार शुक्रवारपासून बंद करण्यात आल्यानंतर आता त्यापाठोपाठ येत्या १३ एप्रिलपासून मार्केट यार्डातील गुळ व भुसार विभाग पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय दि पूना मर्चंट चेंबरने घेतला आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील भुसार विभागही आता बंद राहणार आहे. नाकाबंदी व चौकात तपासणी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची आठवण करून देण्यासाठी एका तासाला घंटानाद केला जात आहे. झोन तीनच्या १७ नाकाबंदीच्या ठिकाणी हा उपक्रम राबविला जात आहे.