#CoronaVirusEffect : विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल बोलले केंद्रीय मनुष्यबळ मंत्री….

देशभरात वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवाच फक्त सुरू आहेत. दरम्यान, शाळा, कॉलेजेसही बंद ठेवण्यात आली आहेत. अनेक राज्यांमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षांचे काही पेपर बाकी आहेत. लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत असणार आहेत. त्यानंतर शाळा कधी सुरु होणार याची निश्चित माहिती अद्याप सरकारने दिलेली नाही. मात्र हा निर्णय १४ एप्रिलनंतरच घेण्यात येईल अशी माहिती केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली.
दरम्यान पीटीआयशी बोलताना पोखरियाल म्हणाले की, कोरोना व्हायरसचं संकट आणि तेव्हाची परिस्थिती पाहून सरकार पुढचे निर्णय घेणार आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांचे आरोग्य, सुरक्षा सरकारसाठी महत्त्वाचे आहे. जर शाळा, कॉलेज १४ एप्रिलनंतरही बंद ठेवण्याची गरज पडली तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल असंही त्यांनी सांगितलं. देशात लॉकडाउन केल्यानंतर आता शाळा, कॉलेज कधी चालू होणार? परीक्षेचं काय? पुन्हा निकाल कधी आणि पुढचं अॅडमिशन कसं होणार याची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना लागली आहे. याबाबत सांगताना पोखरियाल म्हणाले की, सध्या यावर निर्णय घेणं कठीण आहे. देशात ३४ कोटी विद्यार्थी आहेत. ही संख्या अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.
विद्यार्थी हेच देशाची सर्वात मोठी संपत्ती असल्याचे सांगून ते म्हणाले कि , जिथं शक्य आहे तिथं ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. लोकांना परीक्षेबद्दल प्रश्न आहे पण शाळा उघडल्या तर ते होईल असं पोखरियाल म्हणाले. भारतातील लॉकडाउन १४ एप्रिलनंतर संपणार आहे. त्यानंतर पुढची रणनिती ठरवण्यात येईल. आतातरी सरकारचे लक्ष कोरोनाला रोखण्यावर केंद्रीत आहे. दरम्यान, लॉकडाउन वाढणार का असाही प्रश्न लोकांकडून विचारला जात आहे. लॉकडाउनच्या काळात लोक घरातच आहेत. त्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्रीय राहण्यासाठी केंद्र सरकारने एक संदेश दिला आहे. लोकांनी ऑनलाइन शाळेत शिकावं, पुस्तकं वाचा, चित्रपट बघा, नाटक, संगीत यांचा आनंद घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.