#CoronaVirusEffect : मजुरांना आहेत त्याच ठिकाणी थांबवा , केंद्राचे राज्यांना आदेश , मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्याही सूचना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊननंतर मोठ्या शहरांतून आपल्या गाव-खेड्याकडे मजुरांचं आणि गरीबांचं होणारं स्थलांतर केंद्रानं गांभीर्याने घेतले आहे. ‘लॉकडाऊन’ पालन सक्तीनं करवून घेण्याचं काम डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि एसपी यांची जबाबदारी आहे, असे केंद्र सरकारने बजावले आहे. सर्व राज्यांच्या आणि जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या जाव्यात आणि बाहेरून येणाऱ्यांना सीमेवरच्या कॅम्पमध्येच ठेवण्यात यावे , असे आदेश केंद्राकडून देण्यात आले आहेत. स्थलांतर करणाऱ्या मजुरांच्या राहण्याची आहे तेथेच सोय केली जावी तसेच त्यांना वेळेत मजुरी दिली जावी, असे आदेशही केंद्र सरकारने दिले आहेत. हे आदेश न पाळणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही केंद्राने दिला आहे. शहरांतून हायवेवर येणाऱ्या नागरिकांना जागीच थांबविण्यात यावेत असे केंद्राने म्हटले आहे.
देशात केंद्र सरकारने करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सरकारनं लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. परंतु, मजुरांसमोर कोरोनापेक्षाही पोटा-पाण्याचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे ते स्थलांतराच्या प्रयत्नात आहेत. अर्थातच, यामुळे लॉकडाऊन सपशेल फेल ठरताना दिसत आहे. नागरिकांनी हायवेवर येऊ नये. तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा, असं आवाहन करतानाच केंद्रानं राज्य सरकारलाही या लोकांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय करण्याचे आदेश दिले आहेत.स्थलांतर करणाऱ्या या नागरिकांसोबत करोनाही गाव-खेड्यात पोहचला तर परिस्थिती आणखी बिघडू शकते, याचा अंदाजा प्रशासनालाही आहे. देशात आत्तापर्यंत करोनाबाधितांचा आकडा १००० च्या जवळपास पोहचला आहे तर २५ जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
दरम्यान ‘करोना’चा प्रादुर्भाव वाढला असून, त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मजूर, कामगार यांनी कामाचे ठिकाण सोडून जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या मजुरांच्या आरोग्याची काळजी, जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यासाठी शासन सक्षम आहे, असे त्यांनी सांगितले. ठाकरे पुढे म्हणाले, मजूर, कामगारांचे आरोग्य, जेवण, तसेच जिथे आहात त्याच ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश महसूल यंत्रणेला आणि स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे कोणीही कामाचे ठिकाण सोडून जाऊ नये. मदतीची आवश्यकता असल्यास तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महानगरांच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोरोनाच्या भीतीमुळं शहरातील काही नागरिकांनी गावची वाट धरल्याचे चित्र दिसून येत आहे. करोना विषाणूमुळं उद्भवलेली परिस्थिती आणि नागरिकांचे स्थलांतर या मुद्द्यांवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि माहिती घेतली. नागरिकांचे स्थलांतर थांबवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.