#CoronaLatestUpdate : करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७९ तर गेल्या २४ तासात ६ मृत्यू ,एकूण मृत्यूंची संख्या २५ वर…

देशातील ६ राज्यांमध्ये गेल्या २४ तासांत करोनाने ६ मृत्यू झाले आहेत. तर करोनाचे १०६ नवीन रुग्ण आढळून आलेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करोनासंदर्भातील रुग्णांची आज माहिती देण्यात आली. देशात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ९७९ झाली आहे. त्यात २५ मृतांचा समावेश आहे, असं सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं.
देशात आतापर्यंत करोनाच्या ३४, ९३१ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरचे वरिष्ठ अधिकारी डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली. आयसीएमआर आणखी लॅब वाढवणार आहे. ११३ लॅब सुरू झाल्या आहेत आणि ४७ खासगी लॅबना करोना चाचणी करण्याची मंजुरी देण्यात आली आहे, असं गंगाखेडकर यांनी सांगितलं. दरम्यान, देशातील २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे नागरिकांवर मानसिक ताण आला आहे. या पार्श्वभूमीवर NIMHANS ने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. 08046110007 हा नंबर टोल फ्री आहे, असं अग्रवाल यांनी सांगितलं. मालक, व्यावसायिकांनी मजूर आणि कामगारांचे लॉकडाऊन दरम्यानचा पगार कापू नये. त्यांना पूर्ण पगार किंवा रोजंदारी द्यावी. तसंच कामगार, मजुरांना जागा खाली करण्यास सांगू नये, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पुण्य श्रीवास्तव यांनी दिल्या आहेत.