#CoronaVirusEffect : ब्राझीलमध्ये कोरोनावरून राजकारण , राष्ट्राध्यक्ष म्हणतात ” काही लोक मरणारच , त्यासाठी देश काय म्हणून बंद करायचा ?

ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरसवरून थेट राष्ट्राध्यक्ष विरुद्ध प्रांतांचे गर्व्हर्नर यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दरम्यान ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांनी “लोकांची गर्दी होते आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं शक्य होत नाही म्हणून आपल्या देशाला उत्पादनं बंद करणं परवडणारं नाही. आता काही लोक मरणारच, त्याबद्दल दुःख आहे. पण गाडीचे अपघात होतात म्हणून आपण कार फॅक्टरी बंद करू शकत नाही”, असं धक्कादायक विधान केल्यामुळे जाइर बोल्सोनारो चांगलेच चर्चेत आले आहेत.
विशेष म्हणजे ब्राझीलच्या साओ पावलोमध्ये कोरोनाव्हायरची साथ मोठ्या प्रमाणआवर पसरली असून हाच प्रांत ब्राझीलचं आर्थिक केंद्र आहे. शुक्रवारी ब्राझीलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३४१७ वर पोहोचली आहे. देशात कोरोनाव्हायरसने ८२ लोकांचा जीव गेला आहे. या आकड्यांच्या सत्यतेबद्दल राष्ट्राध्यक्षांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. काही जण परिस्थितीचा फायदा उठवत राजकीय खेळी करायचा प्रयत्न करत असल्याचा त्यांनी आरोप केला. ब्राझीलमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानंतर २६ प्रांताच्या गव्हर्नरनी अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाउन करत असल्याचं जाहीर केलं. या लॉकडाउनला राष्ट्राध्यक्षांचाच विरोध आहे.
साओ पावलोमध्ये सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत आणि सर्वाधिक मृत्यू याच राज्यात झाले आहेत. साओ पावलोमध्ये १२३३ केसेस सापडल्या असून आतापर्यंत ६८ लोकांचा मृत्यू झाला आहे. या परिस्थितीमुळे साओ पावलोचे गव्हर्नर जोआओ डोरिया यांनी लॉकडाउन जाहीर केला. डोरिया हे पूर्वी बोल्सोनारो यांच्याबरोबर होते. पण आता ते बोल्सोनारो यांचे राजकीय विरोधक मानले जातात. #BrazilCannotStop ही कँपेन राष्ट्राध्यक्ष बोल्सोरानो यांनी चालवली आहे, असं म्हणत त्यांना थेट विरोध डोरिया यांनी केला आहे. तर डोरिया हे परिस्थितीचा राजकीय फायदा उचलून देशाला नुकसान पोहोचवत असल्याचं राष्ट्राध्यक्षांचं म्हणणं आहे.