#CoronaLockdownEffect : कोरोनाच्या भीतीने पायी गावाकडे निघालेल्यांना भरधाव टेम्पोने चिरडले ५ ठार २ जखमी

देशात कोरोनाचा कहर चालूच असून लॉकडाऊनमुळे निराधार झालेले लोक जिवाच्या भीतीने आपापल्या गावाकडे परतत आहेत. याच प्रकारातून आपल्या गावी गुजरातला पायी जात असताना विरार येथे सात जणांना एका भरधाव टेम्पोने उडविले. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने हातावर पोट असणाऱ्या अनेक कामगारांनी त्याचा धसका घेतला आहे. काम बंद झाल्याने उपासमारीची वेळ आल्यामुळे शेकडो कामगार आपआपल्या मूळगावी पायीच निघाले आहेत.
या अपघातातील सात जणांपैकी दोघांची ओळख पटली असून एकाचे नाव कल्पेश जोशी आणि दुसऱ्याचे मयांक भट असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल संध्याकाळीही काही कामगार गुजरातला पायी निघाले होते. पहाटे साडे तीनच्या सुमारास हे कामगार मुंबई-अहमदाबाद मार्गावरून जात होते. मात्र, पोलिसांनी त्यांना जाण्यास मनाई केल्यानंतर हे सर्व कामगार माघारी फिरले. वसईकडे जात असताना विरार हद्दीतील भारोल परिसरात एका भधाव आयसर टेम्पोने पाठिमागून येऊन त्यांना धडक दिली. हा आयसर टेम्पो सातजणांना चिरडून वेगाने निघून गेला. या भीषण अपघातात पाचजण जागीच ठार झाले आहेत. तर दोन जण जखमी झाले आहेत.