#CoronaVirusEffect : G-20 राष्ट्रांच्या बैठकीसाठी मोदींचा पुढाकार, कोरोना बरोबरच मोदींना चिंता जगाच्या अर्थव्यवस्थेची…

देशात सर्वत्र कोरोनाविषयी भीती व्यक्त केली जात असतानाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पातळीवर कोरोनाशी लढण्यासाठी विशेष रणनीती तयार करीत असून त्यासाठी त्यांनी G-20 देशांची आज व्हर्च्युअल बैठकीचे आयोजन केले असल्याचे वृत्त आहे. आज होणाऱ्या G-20 राष्ट्रांची ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीबाबत पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले आहे. कोविड-१९ या जागतिक साथीच्या आजाराशी लढण्यासाठी G-20 देशांची महत्वाची वैश्विक भूमिका आहे, असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या बैठकीत सकारात्मक चर्चा होईल अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली आहे. या बैठकीचा समन्वय अध्यक्ष देश सौदी अरब आहे.
या विषयीची अधिक माहिती अशी कि , या बैठकीत जगभरातील १९ औद्योगिक देश आणि युरोपीय संघाचे नेते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जागतिक साथीचा आजार असलेल्या करोनाविरोधात योजना तयार करण्यावर चर्चा करतील. या बरोबरच जगभरातील अर्थव्यवस्थांवर होणाऱ्या याच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी योजना तयार केली जाणार आहे. दरम्यान, करोना विषाणूच्या उद्रेकामुळे जगभरात मंदीचे संकट अधिक वाढताना दिसू लागले आहे. गेल्या आठवड्यात सौदीचे युवराज प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि पंतप्रधान मोदी यांच्यात टेलिफोनवर चर्चा झाल्यानंतर ही बैठक होत आहे. या संपूर्ण बैठकीचा समन्वय सौदी अरब हा देश करत आहे. पंतप्रधान मोदी यांनी या संदर्भात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मोरिसन यांच्याशी देखील चर्चा केली होती.
भारताव्यतिरिक्त सार्क देशांमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे. पाकिस्तानमुळे गेल्या काही काळापासून सार्क परिषद टळली आहे. मात्र, ही संधी साधत पंतप्रधान मोदी यांनी सार्क देशांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे आमंत्रण दिले. त्यावेळी झालेल्या चर्चेत पाकिस्तानला सहभागी व्हावे लागले होते. पंतप्रधान मोदी यांच्या या पुढाकारानंतर चीनने देखील दक्षिण आशियायी देशांसोबत व्हर्च्युअल बैठक ओयोजित केली होती.