#CoronaVirusEffect : निर्मला सीतारामन यांनी घोषित केली १ लाख ७० हजार कोटींची मदत , कोणाला ? काय ? मिळणार लाभ ?

देशातील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जवळपास १९० देशांच्या आर्थिक व्यवस्थेला फटका बसला आहे. विविध देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. आज भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी सामान्यांना दिलासा देणाऱ्या काही महत्त्वाच्या घोषणा अर्थमंत्र्यांकडून करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गोरगरिब आणि कामगारांसाठी १ लाख ७० हजारां कोटींची मदत जाहीर केली आहे. तर वैद्यकीय कर्मचारांसाठी ५० लाख रुपयांचा आरोग्य विमा जाहीर केला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलेल्या महत्त्वाच्या घोषणा
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत १ लाख ७० हजार कोटींची मदत जाहीर. ८० कोटी जनतेला या योजनेचा लाभ मिळणार. आरोग्य कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचा आरोग्य विमा, डॉक्टर, पॅरामेडिक आणि स्वास्थ्य कर्मचाऱ्यांना होणार फायदा. ८.६९ शेतकऱ्यांना मिळणार २ हजार रुपये. प्रधानमंत्री सन्मान योजनेअंतर्गत एप्रिलआधीच जमा होणार हफ्ता. मनरेगा मजूरांचा पगार वाढणार. ५ कोटी मजूरांना होणार याचा फायदा. ३ कोटी वरिष्ठ नागरिक, विधवा स्त्रिया आणि दिव्यांगांना १००० रुपये प्रति महिना अशी मदत ३ महिन्यांसाठी मिळणार. उज्ज्वला योजनेअंतर्गत ३ महिन्यांसाठी सिलेंडर फ्री मिळणार. पुढील तीन महिन्यांसाठी EPF सरकार भरेल.पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत ईपीएफ योगदानाची भरपाई केली जाईल. पीएफ योगदान कंपनीच्या १२ टक्के आणि कर्मचारी १२ टक्के म्हणजे २४ टक्के सरकार पैसे देईल.
मंगळवारी निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणेमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत अर्थमंत्र्यांनी वाढवली होती. त्याचप्रमाणे GST भरणाऱ्यांसाठीसुद्धा मुदत वाढवण्यात आली होती. उशीरा भरणाऱ्यांना दंड केला जाणार नाही. पण ३० जूननंतर GST फाइल करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जाईल. या दंडाची रक्कमसुद्धा कमी करण्यात आली आहे. ९ टक्के दरानेच आता दंड घेतला जाईल अशी घोषणा सीतारामन यांनी मंगळवारी केली होती. बचत खात्यासंदर्भातील महत्त्वाची घोषणा देखील सीतारामन यांनी केली होती. बचत खात्यामध्ये किमान शिल्लक (Minimum Balance) नसली तरी कोणतही शुल्क आकारण्यात येणार नाही आहे. म्हणजेच, बँक खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही, या घोषणेमुळे अनेकांना दिलासा मिळाला होता.
आतापर्यंत भारतामध्ये कोरोनाचा ६४९ रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी ४३ जणांची प्रकृती सुधारली असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या परिस्थितीशी सामना करण्यासाठी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर बुधवारी २५ मार्च ते १४ एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊनचं पालन करण्यात येणार आहे. आज लॉकजाऊनच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.