#CoronaVirusUpdate : गंभीर व्हा !! महाराष्ट्रातील संख्या ९७ , पुण्याच्या एका महिलेमुळे २६ गावे झाली क्वारंटाइन…!!

कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता फिरू नका , प्रवास करू नका , जेथे असला तिथेच थांबा , बरे नसेल आहात तेथेच उपचार घ्या असे केंद्र आणि राज्य सरकार सतत सांगत असतानाही लोक काही ऐकायला तयार नाहीत हे खूप गंभीर आहे. अशाच रुग्णांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या थिल्लरपणामुळे कोरोनाची संख्या वाढत आहे. सोमवारी संध्याकाळी आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात ८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातून या नव्या केसेस समोर आल्या आहेत. सांगलीत ४ कोरोनाबाधित रुग्ण उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र सरकारने कोरोनाव्हायरसशी मुकाबला करण्यासाठी कडक निर्बंध लादले आहेत. संध्याकाळपासूनच राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण त्याबरोबरच या विषाणूचा प्रसार आता मोठ्या शहरांपासून महाराष्ट्राच्या निमशहरी आणि ग्रामीण भागात पसरत चालल्याचं उघड होत आहे. सोमवारी संध्याकाळी समोर आलेल्या नव्या केसेसमुळे आता राज्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९७ वर पोहोचली आहे. यात ३ रुग्ण मुंबईत सापडले आहेत तर बाकीच्या पॉझिटिव्ह केसेस सांगली आणि साताऱ्यातील आहेत.
महाराष्ट्रात ८ नवे रुग्ण आढळून आले असून त्यात मुंबई – ३ सांगली ४ आणि सातारा – १ अशा रुग्णांचा समावेश आहे. सांगलीतील चार नवे रुग्ण देवदर्शनासाठी सौदी अरेबिया येथे गेले होते.या चौघांच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे चारही प्रवासी वाळवा तालुक्यातील आहेत. तर कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जगभरात हाहाकार उडवून देणाऱ्या कोरोनाने महाराष्ट्राला धडक दिली आहे. रुग्णांचा रोज नवा आकडा समोर येत आहे. महाराष्ट्रात २४ तासांत तब्बल २४ रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ९७ वर पोहोचली आहे. मागच्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारला कठोर निर्णय घेणं गरजेचं झालं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा केली आहे.
एका महिलेमुळे २६ गावे झाली क्वारंटाइन…!!
दरम्यान टीव्ही वृत्तानुसार पुण्यातील वेल्हा तालुक्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य सरकारकडून नागरिकांना घरात राहण्याचं वारंवार आवाहन केलं जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी हे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील वेल्हा तालुक्यातील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह (Covid – 19) आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दक्षतेचा भाग म्हणून अख्खं गाव क्वारंटाइन मध्ये गेलं आहे. याशिवाय गावागावांतून नागरिकांचा प्रवास झाल्याची शक्यता असल्याने आजूबाजूची तब्बल २६ गावे क्वारंटाइन करण्यात आली आहेत. वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरातील एका ४१ वर्षीय महिला कोनोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने राज्य सरकारने ही खबरदारी घेतली आहे. याशिवाय या गावांमध्ये येण्यासा नागरिकांना बंदी करण्यात आली आहे.
पानशेत परिसरातील साईव, गोरडवाडी, वडाळवाडी आदी गावांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. शिवाय नागरिकांची तपासणी, नोंदणी करण्यासाठी गावांमध्ये चेक पोस्ट तयार करण्यात आले आहेत. कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे. या परिसरात औषध फवारणी केल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली ही महिला मूळची पुण्याची आहे. ती कामानिमित्त वेल्हा तालुक्यात गेली होती. ज्या ज्या गावांत ती गेली आणि प्रवासादरम्यान ज्या गावकऱ्यांशी ती संपर्कात आली, त्यांचा शोध घेतला जात आहे.