#CoronaVirusrUpdate : भारत ३१३ । महाराष्ट्र ६४ गेल्या २४ तासात वाढले ९८ रुग्ण , आज देशात जनता कर्फ्यू …

देशात आणि राज्यात कोरोनाव्हायरस वेगाने पसरतो आहे. फक्त २४ तासांत तब्बल ९८ रुग्ण आढळलेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३१३ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ६३ रुग्ण आहेत. देशात दिवसेंदिवस कोरोनाव्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढतो आहे. शुक्रवारी कोरोनाव्हायरसच ५० रुग्ण आढळले होते. मात्र शनिवारी तब्बल ९८ रुग्ण आढळलेत. फक्त २४ तासांतच रुग्णाची संख्या दुप्पट झाली आहे. आता देशात कोरोनाव्हायरसचे एकूण ३१३ रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यापैकी २२ रुग्ण बरे झालेत, तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील वाढत एकदा लक्षात घेता , महाराष्ट्र कोरोनाव्हायरसच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचतो आहे, असा सूचक इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना दिल्यामुळे चिंता वाढली आहेत.
राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६४ वर पोहोचली आहे. आज दिवसभरात १२ रुग्ण आढळलेत. त्यामध्ये सर्वात जास्त मुंबईत ८, तर पुण्यातील दोघं आहेत. कल्याण आणि यवतमाळमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांपैकी १२ ते १४ जणांना संसर्गातून कोरोनाची लागण झाली आहे तर उर्वरित कोरोनाबाधित हे परदेशातून आले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान पुण्यातील एका रुग्णाला परदेश दौरा न करता कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. या रुग्णाचा अशा कोणत्याही व्यक्तीशी संपर्क आला नव्हता. त्यामुळे या महिलेला कोरोनाव्हायरस कसा झाला, याचा शोध सुरू आहे.
दरम्यान वाढत्या कोरोना व्हायरसला वेळीच रोखणे सरकार पुढे आव्हान आहे. यासाठी सरकार सध्या विविध उपाययोजना करत आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवार, २२ मार्च रोजी एक दिवसासाठी ‘जनता कर्फ्यू ‘ करण्याचं आवाहन केलं आहे. मोदींनी यावेळी सर्वांना एक दिवस घरात राहण्यास सांगितलं आहे.
‘जनता कर्फ्यू’ म्हणजे ‘जनतेसाठी जनतेने लावलेला कर्फ्यू’ असे नमूद करून रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत कोणीही घराबाहेर निघू नये, रस्त्यावर जाऊ नये, मोहल्ल्यांमध्ये, सोसायट्यांमध्ये जाऊ नये. जे अत्यावश्यक सेवेत गुंतले आहेत, त्यांना बाहेर पडावेच लागेल. पण एका नागरिकाच्या नात्याने घराबाहेर पडू नका’ असं आवाहन पंतप्रधानांनी केलंय. ‘जनता कर्फ्यु’दरम्यान मॉल्स, शॉपिंग सेंटर्स, दुकानं बंद राहणार आहेत. परंतु, मेडिकल स्टोअर्स आणि गरजेच्या वस्तू विकणारी दुकानं सुरू राहतील. देशात जवळपास प्रत्येक राज्यात दारूची दुकानं मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत.