#CoronaVirusEffect : ३१ मार्चपर्यंत उद्या सकाळपासून राज्यात सर्वत्र १४४ , लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी : मुख्यमंत्री

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अखेर संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्या सकाळपासून ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊन राहणार आहे. या काळात मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील सर्व नागरी भागांत १४४ लागू करण्यात आले आहेत. याचाच अर्थ राज्यात लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी असणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे कि , आपणा सर्वांसाठीच कठीण काळ सुरू झाला आहे. त्यामुळेच पुढची पावले टाकावी लागत आहेत. जी जिद्द आपण आजवर दाखवली आहे. ती यापुढेही दाखवण्याची गरज आहे. ही आपली परीक्षा आहे आणि आपल्याला ती पास करायची आहे. करोनाला हरवायचं आहे, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. सरकार या संकटात गंभीर आहे. सर्व यंत्रणा झटून काम करत आहे. चाचणी केंद्रे वाढवण्यात येत आहेत. या सर्वांत आम्हाला तुमचे सहकार्य हवे आहे, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यापासून ते आपल्या गावातील सरपंचापर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या संकटाचा संयमाने सामना करायला हवा. यात माणुसकीही बाळगायला हवी. जे कंत्राटी आणि तात्पुरते कामगार आहेत त्यांना किमान वेतन दिले गेले पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा राज्याला संबोधित केलं. यात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. औषधे, भाजीपाला, किराणा दुकाने सुरू राहतील. धान्याची आवक, बँका सुरू राहतील. महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे. ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये. रेल्वे, खासगी बसेस, एसटी बसेस बंद पूर्णपणे बंद. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरू राहील. शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील. आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून मुंबई महाराष्ट्रात येणारी विमाने बंद. ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहे व ज्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका. आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा. ३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात येईल. सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सुरू राहील पण भाविकांसाठी प्रवेश बंद असेल.
पंजाबमध्येही लॉकडाऊन
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत राजस्थानंतर आता पंजाब सरकारनेही मोठा निर्णय घेत संपूर्ण राज्यात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी करोना विषाणूशी लढा देण्यासाठी प्रशासनाला मदत करा असे आवाहन जनतेला केले आहे. या पूर्वी पंजाब सरकारने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. यांमध्ये जालंधर, संगरूर असे जिल्ह्यांचा समावेश होता. परंतु, करोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाल्याने राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत संपूर्ण राज्यातच लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला.
राजस्थानातील गेहलोत सरकारने या पूर्वी करोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून ३१ मार्चपर्यंत राज्यात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. लॉकडाऊन दरम्यान सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये, मॉल, काराखाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असतात. तर, भाजीपाला, दूध आणि दररोज लागण्याच्या आवश्यक गोष्टींची दुकाने, तसेच मेडिकल स्टोअर उघडी राहतात.
करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने गर्दी रोखण्यासाठी अखेर रेल्वेने मुंबईतील लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या चारही मार्गांवरील लोकलसेवा आज मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. याबाबत रेल्वे बोर्डाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.