” त्या ” चौघांना फासावर लटकावल्यानंतर काय म्हणाली निर्भयाची आई ? आणि कोण आहेत निर्भयाच्या वकील ? ज्यांना निर्भयाला न्याय मिळवून दिला …

देशाच्या राजधानीत सात वर्षांपूर्वी अत्याचाराची बळी ठरलेल्या निर्भयाला शुक्रवारी , २० मार्च २०२० रोजी न्याय मिळाला. तिच्यावर अत्याचार करणाऱ्या चारही दोषींना फाशीची शिक्षा झाली. सकाळी ५.३० वाजता चारही आरोपींना फासावर लटकविण्यात आलं. निर्भयाला न्याय मिळावा यासाठी गेल्या सात वर्षांपासून तिचे वकील सतत युक्तिवाद करीत होते. विशेष म्हणजे या वकिलांनी एकही पैसा न घेता हा खटला लढविल्याचं वृत्त आहे. चारही आरोपींना शिक्षा झाल्यानंतर ट्विटरवर #SeemaKushwaha हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला. विशेष म्हणजे सीमा कुशवाह यांचा या खटल्याशी जवळचा संबंध असून त्यांनीच निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले. या दोषींना शिक्षा व्हावी यासाठी सीमा यांनी कनिष्ठ न्यायालयापासून ते वरिष्ठ न्यायालयापर्यंत लढा दिला. इतकंच नाही तर या सात वर्षांच्या कालावधीत त्यांनी फी न घेताच हा खटला लढला.
दरम्यान या चौघांनाही सकाळी ५.३० वाजता तिहार तुरुंगात फासावर लटकावण्याची शिक्षा दिल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. निर्भयाच्या दोषींना शिक्षा झाल्यानंतर तिच्या आईने सीमा कुशवाह यांचे आभार मानले. तसंच तिच्या वडिलांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या. “खूप मोठी लढाई आहे. लोकांना एकच विनंती करेन कधीही मुलगा-मुलगी असा भेदभाव करु नका. आज माझी मुलगी आमच्यात नाही पण मी कायम तिला माझा मुलगाच मानलं. रात्रभर या खटल्याची सुनावणी सुरु होती, पण आम्हाला विश्वास होता, आमचाच विजय होईल. न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे मी आनंदी आहे. पण तरी शांत झोप नाही लागणार. आजही माझ्या मुलीने सिंगापूरमध्ये काढलेला फोटो माझ्या डोळ्यासमोर येतो”, अशा भावना निर्भयाच्या वडिलांनी व्यक्त केल्या.