#CoronaVirusUpdate : इराणसह अमेरिका आणि ब्रिटनमध्ये कोरोनामुळे मरू शकतात ६२ लाख लोक , शास्त्रज्ञांनी व्यक्त केला अंदाज

संपूर्ण जग कोरोना व्हायरसपुढे हतबल झाले असून हि साथ थांबली नाही तर जगभरामध्ये लाखो लोकांचे मरण अटळ असल्याचे संशोधन इराण आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केले आहे. याचा सर्वाधिक फटका चीन नंतर इराण , इटली , अमेरिका , इंग्लंड या देशांना बसत आहे. इराणमध्ये करोनामुळे भितीचे वातावरण असतानाच देशातील एका विद्यापिठातील संशोधकांनी करोनाच्या साथीमुळे केवळ इराणमध्येच ३५ लाख लोकं मरण पावण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर अमेरिकन शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार ब्रिटनमध्ये ५ लाख आणि अमेरिकेत २२ लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो असे म्हटले आहे.
लंडनमधील संशोधक प्रा. निल फर्ग्युसन यांनी इटलीतील परिस्थितीचा अभ्यास करून आपला अहवाल ब्रिटन सरकारला दिला असून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याबाबत कठोर पावले उचलली आहेत. फर्ग्युसन यांचे टिम मेम्बर प्रा. अझरा घनी, कोलबर्न यांनीही येणार काळ अत्यंत कठीण असेल असे म्हटले असून लोकांनी पब, क्लब आणि थिएटरमध्ये जाऊ नये असा सल्ला दिला आहे. ब्रिटनमध्ये १९५० जणांना कोरोनाची लागण झाली असून ७७ जणांचा मृत्यू झाला आहे तर अमेरिकेत ६३१९ जणांना लागण झाली असून १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात या रुग्णांची संख्या १४७ झाली असून यामध्ये २५ विदेशी नागरिक आहेत तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
इराणमध्ये ३५ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भिती
दरम्यान गेल्या महिन्यात अमेरिकेबरोबर सुरु असणाऱ्या वादामुळे अनेक आर्थिक निर्बंध लादण्यात आलेल्या इराणमध्ये कोरोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पाशवभूमीवर इराण मधील शरीफ विद्यापिठातील संशोधकांनी कंप्युटर स्टीम्युलेशनच्या आधारवर काही अंदाज व्यक्त केले आहेत. यानुसार सरकारने वेळीच करोना प्रभावित परिसरांमध्ये सक्तीची बंदी लागू केली नाही, लोकांना सक्ती करुन नियमांचे पालन करण्यास सांगितले नाही आणि उपचाराच्या सुविधा पुरवल्या नाहीत तर पुढील काही आठवड्यांमध्ये इराणमध्ये कोरोनामुळे हजारो जणांचा मृत्यू होईल. “लोकांनी आता स्वत:वर निर्बंध घालून घेतले तरी काही आठवड्यांमध्ये इराणमधील मृत्यांची आकडेवारी १२ हजारांपर्यंत पोहचेल. तसं झालं झाली तर या रोगामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या लाखोंमध्ये अशेल,” अशी भिती टीव्ही पत्रकार आणि डॉक्टर असणाऱ्या डॉ. अरुझ इस्लामी यांनी व्यक्त केली आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर मे महिन्यापर्यंत करोनामुळे इराणमध्ये ३५ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भिती आहे, असं संशोधकांनी म्हटलं आहे.
करोनामुळे सर्वाधिक मत्यू झालेल्या देशांच्या यादीमध्ये इराण तीसऱ्या क्रमांकावर आहे. इराणमध्ये करोनामुळे मरण पावलेल्यांचा आकडा जास्त असून तो मुद्दाम दाबला जात असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही इराण जरी ९८८ लोक दगावल्याचे सांगत असले तरी एकूण मृतांचा आकडा हा पाच पट असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. इराणमधील कोम शहरामध्ये १९ फेब्रुवारी रोजी करोनाचा पहिला रुग्ण अढळून आला होता. त्यानंतर येथे वेगाने करोनाचा प्रसार झाला आहे. करोनामुळे मरण पावलेल्यांना पुरण्यासाठी इराणमध्ये मोठ्या आकाराचे खड्डे खोदण्यात येत असल्याचे सॅटेलाइटने काढलेल्या फोटोंवरुन सिद्ध झालं आहे. याच दरम्यान इराणचे सर्वोच्च सर्वोच्च नेते अयोतोल्ला अली खामेनी यांनी अनावश्यक प्रवास टाळावा असा फतवाच देशातील नागरिकांसाठी जारी केला आहे. खामेनी यांचा फतवा वृत्तपत्रांमध्ये छापण्यात आला असून तो टीव्हीवरुनही प्रसारित करण्यात आला आहे.
८५ हजार कैद्यांची मुक्तता
दरम्यान इराणने करोनाचा फैलाव रोखण्यासाठी चक्क ८५ हजार कैद्यांना मुक्त केले असल्याचे वृत्त आहे. देशातील कायदा आणि न्यायव्यवस्थेसंदर्भातील प्रवक्त्यांनीच ही माहिती दिली आहे. गोल्हामुसेन इस्मायली यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुक्त करण्यात आलेल्या कैद्यांपैकी ५० टक्के कैदी हे सुरक्षेसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आले होते. तसेच या कैद्यांना मुक्त करण्यात आले असले तरी करोनाचा तुरुंगामध्ये प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पूर्ण काळजी घेतली जात आहे.” मुक्त करण्यात आलेल्या कैद्यांमध्ये राजकीय कारणांसाठी तुरुंगात डांबण्यात आलेल्यांचा आकडाही मोठा आहे. संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार काद्यासंदर्भातील नियुक्त अधिकारी जावेद रेहमान यांनी राजकीय कारणांसाठी तुरुंगात डांबण्यात आलेल्यांची सुटका करावी अशी मागणी सरकारकडे केली होती. रेहमान यांनी मागणी मान्य करण्यात आली आहे. करोना विषाणूने इराणमधील परिस्थिती भीषण असून आतापर्यंत सर्वोच्च नेते अयोतोल्ला अली खामेनी यांचे सल्लागार महंमद मीर महंमदी, गिलानचे खासदार महंमद अली रामेझनी यांचा करोना संसर्गाने मृत्यू झाला. इराणमध्ये शाळा, विद्यापीठे बंद करण्यात आली असून सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. देशात कामाचे तासही कमी करण्यात आले आहेत. तेथील ३१ प्रांतात विषाणूचा प्रसार झाला आहे.