#CoronaVirusUpdate : प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तीन दिवस पुणे बाजारपेठ बंद तर या “दोन” ठिकाणीही लागू झाले १४४ कलम …

Maharashtra: All shops in Pune have been shut down for three days on the call of Federation Of Association Of Pune due to #Coronavirus. Total 39 positive cases have been reported in the state. pic.twitter.com/89AWtQB2of
— ANI (@ANI) March 17, 2020
कोरोना व्हायरस नियंत्रणात यावा या उद्देशाने खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पुण्यातील कोरोनाबाधित १६ रुग्णांची प्रकृती स्थिर असून २७ जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्याचं अहवालात समोर आलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ३९ झाली आहे. रुग्णांचा वाढता आकडा पाहता पुण्यात बाजारपेठांसह सगळी महत्त्वाची ठिकाणी बंद ठेवण्यात निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून पुढचे ३ दिवस व्यापार बंद राहणार आहे. किराणा, जीवनावश्यक वस्तू, दूध डेरीज, औषधं, भाजीपाला, फळं वगळता इतर दुकानं बंद राहणार असल्य़ाची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुण्यात संचारबंदी नसून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोक एकावेळी गर्दी करून उभे राहू शकत नाही.
दरम्यान महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण अथवा संशयित आढळले आहेत अशा सर्वच जिल्ह्यांध्ये आणि शहरांध्ये खबरदारी म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई, गोवा, पुण्यानंतर आता नागपूर आणि वर्धामध्येही जमावबंदी म्हणजेच कलम १४४ लागू करण्यात आला आहे. आजपासून ३१ मार्चपर्यंत हा कायदा लागू करण्यात आला असल्याचे आदेश सह-पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी दिले आहेत. कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देऊ नये असंही सह-पोलीस आयुक्तांतर्फे सांगण्यात येत आहे. या काळात कोणत्याही कार्यक्रमाला, मोर्चाला, सभेला परवानगी मिळणार नाही. ‘कलम १४४’ म्हणजे जमावबंदी हा संबंध जोडला जात असला, तरी यावेळी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीसाठी हे कलम लागू करण्यात आले आहेत, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, काळजी घ्यावी, सार्वजनिक जागी किंवा समारंभात जाणे टाळावे, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तर कोरोना एक बळी घेतला आहे. मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात ६४ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. दुबईहून आलेल्या या व्यक्तिला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्वरित कस्तुरबा दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे अनेक शासकीय कर्मचारी, विभाग धास्तावले आहेत. खासगी क्षेत्रातही जवळपास ५० टक्के कर्मचारी घरातून काम (Work From Home) करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय कार्यालये देखील काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, शासकीय अत्यावश्यक सेवा सोडून इतर कार्यालय बंद करता येईल का, यावर कॅबिनेट बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वेगाने वाढतो आहे. शहरांमधल्या शाळा, महाविद्यालयं आणि सार्वजनिक स्थळं बंद केली तरी सर्वच कर्मचारी घरून काम करण्याची सोय वापरू शकत नाहीत. आता खुद्द मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनीच आम्हाला घरून काम करू देण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मंत्रालयातल्या एका विभागाच्या अधिकाऱ्याच्या घरात कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळेच महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी संघटनेच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे.
कल्याण येथे राहणाऱ्या मंत्रालयातील एका विभागाच्या अधिकाऱ्याच्या घरात कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण सापडल्याने मंत्रालयात खळबळ उडाली. त्याचाही उल्लेख मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रात करण्यात आला आहे. साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे. Covid-19 चा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ते उपाय योजणं आवश्यक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ही वर्क फ्रॉम होमची मुभा द्यावी, अशी मागणी राजपत्रित कर्मचारी संघटनेने केली आहे.