#CoronaVirusEffect : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांनीही स्वतःचे घरातच केले विलगीकरण

https://twitter.com/TheDilipKumar/status/1239617934319730688
मुंबईतील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो यांनीही दिलीप कुमार यांना करोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आयसोलेशन मध्ये ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिलीप कुमार यांना त्यांच्या खराब प्रकृतीमुळे याआधीही अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय पत्नी सायरा बानो यांनी घेतला. यामुळे करोनाचे विषाणू त्यांच्या जवळपास पोहोचणार नाहीत.
याबाबत दिलीप कुमार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की , ‘करोना व्हायरसचा होत असलेला प्रादुर्भाव पाहता मी पूर्णपणे इतरांपासून दूर आहे. पत्नी सायरा बानो माझ्या सुरक्षेच्या संदर्भातली एकही गोष्ट अपूर्ण सोडत नाहीत.’ दिलीप कुमार यांच्या या पोस्टनंतर चाहते त्यांच्या सृदृढ आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. तसेच स्वतःला इतरांपासून वेगळं करण्याच्या त्यांचा निर्णय योग्य असल्याचे म्हणत आहेत.
घरातही करता येईल विलगीकरण
दरम्यान आपल्या घरातील स्वतंत्र खोलीतही विलगीकरण करता येईल. रुग्णाचा १४ दिवस कुणाशी संपर्कात येऊ नये. या खोलीत स्वतंत्र टॉयलेट-बाथरूम आवश्यक असून या खोलीचे निर्जंतुकीकरण खूपच आवश्यक आहे. रुग्णाला खाद्यपदार्थ काही अंतरावरून दिले जावेत. ज्या रुग्णाबाबत करोनाची लागण झाल्याची शंका आहे, पण सध्या तरी रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही, अशी व्यक्तीच स्वतःच घरीच विलगीकरण करू शकते. मात्र काही दिवसांनी लक्षणे जाणवू लागल्यास तत्काळ पालिकेच्या आरोग्य खात्याकडे संपर्क साधावा, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.