Corona Virus News Update : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ११४ , कर्नाटकातील ४ पत्रकारही देखरेखीखाली, राज्यातील मंदिरांचे दरवाजे झाले बंद !!

The total number of confirmed cases of #coronavirus rises to 114 in India pic.twitter.com/dzwcZoQK7C
— ANI (@ANI) March 16, 2020
देशातील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांची संख्या ११४ झाली असून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या भारतातील पहिल्या रुग्णाच्या मुलीलाही या साथीची लागण झाली आहे. कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये ७६ वर्षीय वृद्धाचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला होता. आता त्यांच्या कन्येचे कोरोना रिपोर्ट्सही पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. मयत वृद्धाच्या कुटुंबातील तिघांचे अहवाल शनिवारी ‘निगेटिव्ह’ आले होते, परंतु त्यांच्या ४५ वर्षीय कन्येचा रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आल्याने प्रशासनासमोरील अडचणी वाढल्या आहेत. कलबुर्गीमधील ‘ईएसआयसी’ हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात चौघा जणांना ठेवण्यात आले आहे.
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचा जिल्ह्यातील एकूण ६७ जणांशी संपर्क झाला होता. जिल्हा आरोग्य विभागाने १४ दिवसांच्या तपासासाठी सर्वांना विलग ठेवले आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार मृताच्या मुलाची मुलाखत घेणाऱ्या चार पत्रकारांनाही ‘आयसोलेशन वॉर्ड’मध्ये ठेवण्यात आलं आहे. दरम्यान कर्नाटकातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातवर पोहचली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात ३८ जणांना लागण झाली असून पुण्यात रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे.
आतापर्यंत देशात ११४ जण ‘कोरोना पॉझिटिव्ह’ आढळले आहेत. यापैकी ९९ जणांवर उपचार सुरु आहेत. दोघांचा मृत्यू झाला असून १३ जण ‘कोरोना’च्या धोक्यातून मुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली. मुंबईत तीन, तर नवी मुंबई आणि यवतमाळमध्ये प्रत्येकी एक नवा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 33 वरुन 38 वर गेली आहे. आता मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ८ वर पोहोचली आहे.
पुणे – 16 । मुंबई – 8 । नागपूर – 4 । यवतमाळ – 3 । नवी मुंबई – 3 । ठाणे – 1 । कल्याण – 1 । अहमदनगर – 1 औरंगाबाद – 1
सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन भाविकांसाठी बंद
मुंबईतील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सिद्धीविनायक मंदिराचे दर्शन भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. राज्यसरकारने राज्यातील सर्व देवस्थान संस्थांनानाही मंदिर बंद ठेवण्याची विनंती केली आहे. त्यानुसार सिद्धीविनायक बाप्पाचे दर्शन शासनाचे आदेश मिळेपर्यंत बंद राहणार आहे. याशिवाय राज्य सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये, गर्दीची ठिकाणी जाणे टाळा असे आवाहनही केले आहे. परंतु, सदर कालावधीत मंदिर ट्रस्टतर्फे देण्यात येणारी वैद्यकीय मदतीसाठी, वैद्यकीय मदत कक्ष रुग्णांसाठी सुरु राहिल.
दरम्यान, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने संपूर्ण देशभरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा फटका पर्यटन स्थळे आणि देवस्थानांनाही बसला आहे. राज्यातील प्रमुख देवस्थान अंबाबाई, शिर्डी, सिद्धिविनायक, तुळजाभवानी, सप्तश्रृंगी देवी, काळुबाई, पंढरपूर येथील भाविकांची गर्दी ओसरली आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. तुळजाभवानी देवीची चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी पहाटे ५ वाजल्यापासून मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंद असणार आहे. तुळजाभवानी देवीची चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे.
देवीची चरण तीर्थ, प्रक्षाळ पूजा आणि अभिषेक पूजा या भक्तांसाठी बंद असतील असे तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक योगिता कोल्हे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांचे अध्यक्ष दिपा मुंडे मुधोळ यांचे पुढील आदेश येईपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे. तुळजाभवानी देवीची ५ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान होणारी चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे . तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आंध्रप्रदेशसह देशभरातील भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, कोरोनामुळे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आल्याने भाविकांनी तुळजापूर येथे दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन मंदिर संस्थानच्या अध्यक्षा दिपा मुंडे यांनी केले आहे.
गणपतीही घातला मास्क
थंडी वाढल्यावर गणपती बाप्पाच्या अंगावर स्वेटर-मफलर घालण्याची पद्धत पुणेकरांना नवीन नाही. मात्र ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नाशकातही अनोखी क्लुप्ती लढवली जात आहे. चक्क गणपती बाप्पाच्या मूर्तीला कापडी मास्क लावण्यात आला आहे. नाशिकमधील रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाच्या ‘चांदीच्या गणपती’ला मास्क लावण्यात आला आहे. कोरोना व्हायरसपासून आपल्या लाडक्या बाप्पाचा बचाव करण्यासाठी गणेशभक्तांनी ही काळजी घेतल्याचं दिसत आहे. ‘रविवार कारंजा’चा चांदीचा गणपती अशा अनोख्या कारणांनी नेहमीच चर्चेत असतो. यावेळीही जनजागृती करण्यासाठी बाप्पाला प्रतिकात्मक मास्क लावल्याचा दावा विश्वस्तांनी केला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये आतापर्यंत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. परंतु कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत घट झाली आहे.